* पत्रकार शिवाजी जाधवांची तक्रार
* नागरिकांचे तीव्र आंदोलनाचे संकेत
खोपोली / प्रतिनिधी :- शिळफाटा खोपोली येथील जैन मंदिराशेजारील दीपज्योत बिल्डिंगमधील अनधिकृत अतिक्रमणाचा प्रश्न महिना होत आला तरी सुटलेला नाही. १८ नोव्हेंबर रोजी पत्रकार शिवाजी जाधव यांनी खोपोली नगर परिषदेकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे.
तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे, दीपज्योत बिल्डिंगमधील काही रहिवाश्यांनी गाळ्यांसमोर अनधिकृत बांधकाम करून गटारांवर अतिक्रमण केले आहे. अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत काहीच घडलेले नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पत्रकार शिवाजी जाधव यांनी सांगितले की, प्रशासनाचा हा निष्क्रियपणा नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे. जर लवकरच कारवाई झाली नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या उदासिनतेवर रोष व्यक्त केला आहे. सार्वजनिक जागांवर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे आणि स्वच्छतेच्या समस्याही वाढत आहेत, असे नागरिकांनी सांगितले.
नगर परिषदेच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, संपूर्ण प्रकरण तपासाधीन आहे. योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, या सवयीच्या आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही.
शिळफाटा परिसरातील हा प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नमुना ठरत असून, तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.