* आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या एमएएस फायनान्स बँकेवर त्वरित गुन्हा नोंदवून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची जनतेची मागणी
उरण / विठ्ठल ममताबादे :- उरण तालुक्यात करंजा येथे बँकेच्या मनमानी व हुकूमशाही कारभारामुळे एका निष्पाप मुलाला आत्महत्या करावे लागले आहे. सदर घटना ही समस्त कर्जदार गरिबांसाठी जीवघेणी घटना ठरली आहे. एमएएस (मास) फायनान्स बँकेने वारंवार त्रास व मानसिक छळ केल्याने करंजा येथील प्रथमेश देसाई या मुलाने आत्महत्या केली आहे. कोणतेही चूक नसताना एका निष्पाप मुलाला आत्महत्या करावी लागली आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या मुलाच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे. मुलगा अचानक गेल्याने आई-वडील व त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, अन्यायकारक पद्धतीने देसाई याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना आणि एमएएस (मास) फायनान्स कंपनी संचालकांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रथमेश देसाई यांच्या आई-वडिलांसह जनतेतून केली जावू लागली आहे.
दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी वृषाली विलास देसाई यांच्या नावे मोटारसायकल १५,०००/- (पंधरा हजार रूपये मात्र) डाऊन पेमेंट देऊन कर्जाने घेण्यात आली. दरमहा हप्ता ३,७८८/- होता. आतापर्यंत १६ हप्ते नियमितपणे भरले होते. गाडीची किंमत होती १,०८,०००/ - (अक्षरी रुपये एक लाख आठ हजार मात्र) होती. आतापर्यंत रुपये ७५,६०८/- (अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार सहाशे आठ मात्र) भरले होते. अंदाजे ३२,०८६/- (अक्षरी रुपये बत्तीस हजार श्याऐंशी मात्र) बाकी होती. केवळ बत्तीस हजार रुपयांच्या वसुलीसाठी कंपनीचे एजेंट अशोक सावंत, दिलीप सिंग यांचे धमकीचे फोन आमचा मुलगा प्रथमेश विलास देसाई याला यायचे. आमचा मुलगा जेएनपीटी पोर्ट (एनएसआयसीटी) येथे कामाला होता. त्याला मासिक पगार महिन्याला रुपये १३,०००/- (अक्षरी रुपये तेरा हजार मात्र) त्यातून तोच दरमहा कंपनीस कर्ज हप्ता जी. पे. (गुगल पे) करायचा. नियमितपणे हप्ते भरायचा तरी मात्र एमएएस (मास) फायनान्स बँकेने अन्यायकारक पद्धतीने माझा मुलगा प्रथमेश देसाई याचा छळ केला व त्याला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्याने आत्महत्याचे शेवटचे पाऊल उचलले याला सर्वस्वीपणे एमएएस (मास) फायनान्स बँकेचे संचालक व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांना अटक करून, गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रथमेश देसाई याची आई वृषाली देसाई, वडिल विलास देसाई यांनी केली आहे.
गाडी आईच्या नावे होती. आई उरण मोरा रोडवरील नगराज इंटरनॅशनल स्कूल, बोरी रोड येथे शिपाई म्हणून काम करीत आहे. तर वडील विलास देसाई हे दैनिक वृत्तपत्र विकायचे काम उरणमध्ये करतात. मोठे भाऊ हर्षल विलास देसाई (वय-२८ वर्षे) गणपती बनविण्याच्या करखान्यात कामगार आहेत. एका सर्वसामान्य कष्टकरी परिवाराच्या मुलास रात्री-बेरात्री सारख्या धमक्यामुळे बेजार करण्यात आले. व राहत्या घराच्या बाजूजवळील विहीरीवर सर्वांसमक्ष त्या गाडीबाबत अपमानित केले. त्यावेळी गावातील महिला व नागरिक उपस्थित होते, त्याची गाडी दारातून धमकीने व जबरदस्तीने बुधवार दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता खेचून नेली. तेव्हा त्याचा मनावर आघात झाला व त्यांनी ५.३० ते ६ वाजेदरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा प्रथमेश जवळ कोणीही नातेवाईक नव्हते. तो एकटाच घरी होता. मात्र फायनान्स बँकेचे मनमानी कारभार व त्रास देण्यासंदर्भातील सर्व व्हॉट्स ॲप मेसेज आपल्याकडे उपलब्ध आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन तात्काळ गुन्हा नोंदवावी, अशी मागणी आई-वडील यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी समस्त उरणकरांचे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई पोलिस, उरण पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वृषाली विलास देसाई (आई), विलास कृष्णाजी देसाई (वडील) यांनी केली आहे. काही हप्ते भरायचे शिल्लक होते. प्रथमेश ते हप्ते भरणार होता मात्र मुद्दामून जाणीवपूर्वक प्रथमेश याला त्रास दिल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने बँक फायनान्स विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात एमएएस फायनान्स सर्विसच्या 9024006071, 8149945114 या नंबरवर कर्मचाऱ्यांना फोन लावले असता ते फोन उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत. दुसऱ्या कोण्या व्यक्तीने याच नंबरवर फोन केल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. प्रथमेशच्या मोठ्या भावाने या नंबरवर फोन केले असता आम्ही फायनान्सचे काम करत नाही. तुला काय करायचे कर. आम्ही कोणाला घाबरत नाहीत असे उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तसेच प्रथमेश याच्या मोठ्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा फोनवरून दिली आहे.
सध्या आरबीआयने कर्ज वसुली संदर्भात विविध बँका, फायनान्स कंपनी, विविध वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था संघटना यांच्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. कोणत्याही कर्जदाराची पिळवणूक करू नये. कोणत्याही कर्जदाराला त्रास देऊ नये असे नवीन नियमात आहे असे असून देखील सदर फायनान्स बँकेने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याने प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या देशात उद्योगपतीचे कर्ज माफ होतात मात्र सर्वसामान्य गरीब लोकांचे कर्ज माफ का होत नाही ? असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जावू लागला आहे. हप्ते वसुली संदर्भात गोरगरीब लोकांना नेहमी, सतत त्रास का दिला जातो ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
