* तनवीर महिला बचत गट अध्यक्षा फिरोजा पिंजारी यांचे निवेदन
खोपोली / प्रतिनिधी :- मी 2018 पासून न्यूज पेपर व मिडीयाचा व्यवसाय करीत आहे. मी एचएससी डिएड आहे तर माझे पती जनसंवाद व पत्रकारीता क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत. मागील काही वर्षापासून व्यवसायात नुकसान झाले असल्याने कर्ज झाले आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी मी तनवीर महिला बचत गटाच्या माध्यमातून काही कर्ज घेतले होते. तसेच काही मायक्रो फायनान्स कंपनी, बँकेकडून देखील कर्ज घेतले होते. मागील महिन्यात दवाखान्याचा खर्च आल्याने महिला बचत गटाचा हफ्ता भरू शकलो नाही. या महिन्यात तर काही मायक्रो फायनान्स कंपनी व महिला बचत गटाचा हफ्ता अद्याप भरू शकलेलो नाही, त्यामुळे महिला बचत गट वसुली अधिकारी व कर्मचारी मागील काही दिवसांपासून मानसिक छळ करीत आहेत. आज तर महिला बचत गटाच्या अधिकारी गायकवाड मॅडम आणि त्यांच्या सहकार्यांनी घरी येवून माझी बेइज्जती केली. तसेच उद्या हफ्ता भरला नाही तर पाहून घेवू अशी धमकी गायकवाड मॅडम यांनी दिली आहे.
सध्या आर्थिक अडचणीतून निघण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील चार महिन्यांपासून बंद पडलेला व्यवसाय 2025 जानेवारी अखेरपर्यंत सुरू करण्याची आमची धडपड सुरू आहे. पण गायकवाड मॅडम यांनी धमकी दिली आहे की जर हफ्ता भरला नाही तर सिबिल खराब करू...तुम्हाला व महिला बचत गटात असलेल्या सर्व महिला सदस्यांचा सिबिल खराब करून त्यांना कुठेही कर्ज मिळणार नाही असा बंदोबस्त करू...जर व्यवसाय वाढवायचा असेल तर बँक, मायक्रो फायनान्स, प्रायव्हेट फायनान्स व शासकीय निधीची गरज पडेल. मात्र, गायकवाड मॅडम व त्यांची टीम आम्हाला यापुढे कर्ज मिळू नये असा बंदोबस्त करणार असल्याने आम्ही बरबाद होवू...तसेच उद्या हफ्ता भरला नाही तर गायकवाड मॅडम व त्यांची टीम आमच्यासोबत काय करेल, हा विचार करून करून मला भिती वाटत आहे...त्यातच गल्लीत...घरात व बचत गटाच्या मिटींगमध्ये मला अपमानित करण्यात आल्याने मला जगणे अवघड वाटू लागले आहे. तरी अशा परिस्थितीत महामहिम राष्ट्रपती महोदया यांनी मला व माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तनवीर महिला बचत गट अध्यक्षा फिरोजा पिंजारी यांनी ईमेलद्वारे केली आहे.
दरम्यान, बचत गट व बँक, मायक्रो फायनान्स कंपनी यांच्या मानसिक छळामुळे मी, माझे पती व मुलांनी जिवाचे बरेवाईट केल्यास...माझ्या चार लोकांच्या कुटुंबातील कुणाच्या ही जिवास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी महिला बचत गटाच्या वसुली अधिकारी व कर्मचारी तसेच उद्या हफ्ता भरला नाही तर पाहून घेवू अशी धमकी देणाऱ्या गायकवाड मॅडम यांची राहील...तसेच महिला बचत गटाचा हफ्ता वसुलीसाठी दबाव टाकणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, बँक कर्मचारी यांची राहिल, असे निवेदनाद्वारे त्यांनी म्हटले आहे.