39 वर्षांपासून अखंड चालत आलेल्या वारे येथील हरिनाम सप्ताहात दीपोत्सव भक्तीभावात संपन्न

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या वारे गावात मागील 39 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहात कीर्तन, प्रवचन व ज्ञानदानाच्या माध्यमातून धर्मजागृतीचे कार्य केले जाते. या वर्षी सप्ताहाच्या सातव्या दिवशी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

त्र्यंबकेश्वर मठाधिपती बालयोगी गणेशजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दीपोत्सव भक्तीभावाने संपन्न झाला. त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जात, पात विसरून प्रत्येक जीवाला संस्कारांचे ज्ञान मिळावे. धर्मनिरपेक्षतेची भावना मनाशी बाळगून आध्यात्मिक कार्य करा.” यावेळी त्यांनी भाविकांना आशीर्वाद देत आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्ग दाखविला.        

दीपोत्सवात पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त, वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. हा सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.

या प्रसंगी विविध तीर्थक्षेत्रांतील साधुसंतांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रेय घोलप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

बालयोगी गणेशनाथजी महाराज यांचे मार्गदर्शन हे भाविकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी नमूद केले की, “आध्यात्मिकतेचे खरे स्वरूप ही मानवतेच्या कल्याणासाठी असते. यासाठी प्रत्येकाने निस्वार्थपणे कार्य करणे गरजेचे आहे.” या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर भक्तिमय बनला असून, पुढील वर्षीही अशीच भक्तिभावाने परंपरा जपली जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post