खोपोली नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे निलंबित

खोपोली / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेचे तत्कालिन मुख्याधिकारी अनुप दुरे यांना नगर विकास विभागाकडून शासन आदेश,  क्र. एमसीओ-२०२३/प्र.क्र.३७४/नवि-१४ दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी या पदावरून सहायक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका या पदावर पदस्थापना करण्यात आली होती. परंतू अनुप दुरे यांनी प्राधिकाऱ्यास कोणतीही पूर्वसुचना न देता व पूर्व परवानगी न घेता ते सदर पदावर रूजु झाले नाहीत. तसेच सदर कारणासाठी त्यांना शासन पत्र क्र. एमसीओ-२०२३/प्र.क्र.३६२/नवि-१४ दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी कारणे दाखवा याबाबत नोटीस देखील बजाविण्यात आली होती. त्यानंतरही ते सदर पदावर रूजू झाले नाहीत. ही बाब गंभीर असून त्यांनी शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ चा भंग केला आहे. तसेच अनुप अनुप दुरे यांना मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. सदर बाब त्यांना माहित असून देखील त्यांनी खोपोली नगर परिषदेच्या वाहन चालकावर दबाव टाकून शासकीय वाहन घेऊन ते दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथे गेले होते. यावरून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर निलंबन करण्याचे आदेश दिले असल्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post