* १० लाख ३८ हजार ४०० रुपये किंमतीचे गहाळ मोबाईल मिळविण्यात खोपोली पोलिसांना यश
खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर पोलिस ठाण्यात बुधवार, १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरीकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सचा मोठ्या प्रमाणावर खोपोली पोलिसांनी शोध घेवून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळया ठिकाणांहून १७८ मोबाईलपैकी १० लाख ३८ हजार ४०० रुपये किंमतीचे एकूण ७१ मोबाईल फोन मिळविण्यात यश मिळाले असून मुळ तक्रारदार, गहाळ मोबाईल मालक यांना कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
सर्वसाधारणपणे मोबाईल फोन ही प्रत्येक नागरीकांच्या जिव्हाळ्याची बाब असून मोबाईल फोन ही सद्या चैनीची वस्तू नसून गरजेचे उपकरण झाले आहे. तथापी ब-याचवेळा आपल्याकडून मोबाईल फोन कोठे तरी विसरणे, पडून गहाळ होणे, चोरीस जाणे अशा बाबी होतात. त्याबाबत खोपोली पोलिस ठाण्याकडे २०२४ मध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सच्या दाखल झालेल्या तक्रारींचा नव्याने आढावा घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी आदेश पारित केले होते.
या पार्श्वभूमीवर खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या सुचनेप्रमाणे खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे व पो.कॉं. अमोल राठोड यांच्या पथकाने खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जानेवारी २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या १७८ मोबाईल फोन्सचा सीआयईआर (CIER) या मोबाईल ट्रेस अॅप्लीकेशनच्या माध्यमातून शोध सुरु केला.
या मोहिमेमध्ये नमूद गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे पुन्हा ट्रेस करण्यात आले आणि पोलिस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळया ठिकाणांहून सुमारे ७१ मोबाईल फोन्स हे परत मिळविण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त झाले.
पुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची एकूण किंमत ही १० लाख ३८ हजार ४०० रुपये इतकी होत असून सदरचे मोबाईल फोन्स हे कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते खोपोली पोलिस ठाण्याच्या वतीने मुळ तक्रारदार व गहाळ मोबाईल फोन मालक यांना परत करण्यात आले. ही उल्लेखनिय कामगिरी ही पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व खोपोली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोसई अभिजीत व्हरांबळे आणि पोकॉं अमोल राठोड यांनी पार पाडली.