मुंबई / प्रतिनिधी :- महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान ठरले आहे. भारताची एकता आणि अखंडता संविधानामुळे मजबुत झाली असुन संविधान हे भारतीय लोकशाहीचा प्राण ठरले आहे, असे सांगत रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय जनतेला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत देशात अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक धर्म आणि जातीची विविधता आहे. विविधतेने नटलेल्या या देशाला राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देऊन एक राष्ट्र म्हणुन अंखड एकजुट भारत उभा करणारे आपले भारतीय संविधान आहे. संविधानातून समता, बंधुता, एकता, सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्य या मुल्यांची शिकवण देशात पेरली आहे. संविधानाच्या बळावर जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही भारतात नांदत आहे. लोकशाहीच्या इमारतीचा पाया ठरलेल्या संविधानाचे निर्माते महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर आहेत याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी केले. जोपर्यंत सुर्य, चंद्र आहे, तोपर्यंत भारतीय संविधानाला कोणी ही धक्का देऊ शकत नाही, असे ना. रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
