महायुतीचा घटक पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 


मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित होईल. मुख्यमंत्री कोणीही होवो मात्र मुख्यमंत्री हा महायुती सरकारचा राहिल. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद द्यावे तसेच काही 4 महामंडळाचे अध्यक्ष पदे, उपाध्यक्ष पदे व विधान परिषद सदस्यत्व द्यावे अशी आग्रही मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय करण्यात सर्वच घटक पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपच्या गोटातून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्याची मागणी होत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून खुप चांगले काम केले म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. आता मात्र भाजपकडे आमदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात त्यावर पुढील वाटचाल आहे. मुख्यमंत्री कोण होतो ते पहावे लागेल मात्र महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद निश्चित द्यावे. एक विधान परिषद सदस्यत्व द्यावे. 2 महामंडळाचे अध्यक्षपदे, 2 उपाध्यक्ष पदे आणि काही कार्यकर्त्यांना महामंडळाची संचालक पदे द्यावीत, या मागणीचा पुनरूच्चार ना. रामदास आठवले यांनी केला.

भाजप नेते संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ना. रामदास आठवले यांनी सागर बंगल्यावर भेट घेऊन सत्ता वाटपात रिपब्लिकन पक्षालाही वाटा मिळावा अशी मागणी केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post