* अन्यथा पत्रकार रस्त्यावर उतरून करणार आंदोलन करणार - पत्रकार राजेंद्र जाधव
* वर्षभरापासून बिल्डिंगचे सांडपाणी रस्त्यावर जोमात अन् नगर परिषद प्रशासन कोमात?
* खोपोली शहरातील गटाराच्या सांडपाण्याने पातळगंगा नदीत दूषित
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदमध्ये येणारे चिंचवली डीपी रोडवर गेल्या वर्षभरापासून एका नामांकित बिल्डराने आपल्या बिल्डिंगमधून दररोज निघणारे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडल्याने या सांडपाण्यातून शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे. खोपोली नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे वर्षभरापासून हे सांडपाणी रस्त्यावर धो-धो वाहत असून रस्त्यावर पडलेल्या खड्डयात साठत असून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडून कपडे घाण होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. हे पाणी अमृतजल नाही तर अस्वच्छ सांडपाणी आहे याची नोंद खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी घ्यावी ? अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. बिल्डरांनी पैसे कमवायचे आणि खोपोलीकरांनी रोगराईला सामोरे जावून उपचारासाठी आपल्या मेहनतीने कमविलेले पैसे गमवायचे का ? खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांना खोपोलीकरांच्या जिवाची काळजी राहिली नाही का ? अशा बेजबाबदार मुख्याधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकारी बदली का करीत नाही ? मोठे आंदोलन, उपोषण, जलसमाधी, आत्मदहन केल्यावर अशा बेजबाबदार कामचुकार, लोकसेवकाची बदली होणार का ? असा संतप्त सवाल खोपोलीकरांमधून विचारला जात आहे.
खोपोली शहरातील बिल्डरांकडून मोठ्या जोमाने बिल्डिंग बांधण्याची कामे सुरु आहेत. बिल्डिंग बांधण्यासाठी जागा बिनशेती करणे व आर झोनमध्ये असणे आवश्यक आहे. जागा बिनशेती करण्यासाठी व बिल्डिंग बांधण्यासाठी ढिगभर अटी, शर्ती व नियम लागू आहेत. बिल्डिंगचे बांधकाम सुरु असतांना व पूर्ण झाल्यावर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना बिल्डिंगची पाहणी करून बिल्डिंगमधील दररोज निघणारा घनकचरा व सांडपाण्याची विल्हेवाट बिल्डरने कशा पद्धतीने केली आहे...रोडपासून किती अंतरावर बिल्डिंग बांधली आहे...किती लांबी-रुंदीचे बांधकाम केले आहे...किती मजली इमारत बांधली आहे...झाडे लावली आहेत की नाही...बिल्डिंग नियमानुसार बांधली आहे की नाही, याची सर्व कागदपत्रे घेऊन पाहणी केल्यावर ओसी दिली जाते. मात्र, बिल्डिंगचे सांडपाणी रस्त्यावर सोडले असतांना या बिल्डरला नगर परिषदेने ओसी दिलीच कशी ? असा प्रश्न खोपोलीकरांनी उपस्थित केला आहे.
खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांना पत्रकारांनी माहिती विचारण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता पत्रकारांचे फोन उचलण्याचे कष्ट घेण्यात आलेले नाहीत. तसेच कार्यालयामध्ये जावून भेटण्याचा प्रयत्न केला असता पत्रकारांना भेटून माहिती देखील देण्यात आली नाही. तसेच नगर रचना विभागाचे अधिकारी यांना भेटून पत्रकारांनी माहिती विचारली असता त्यांनी माहिती देतांना सांगितले की, आम्ही ह्या बिल्डरला आधी नोटीस बजावली असून गटार काढण्याचे सांगितले आहे. खोपोली शहरातील नगर परिषदेने अनेक गटारे बांधली व त्यातून वाहणारे सांडपाणी थेट पाताळगंगा नदीत सोडले आहे. त्यामुळे पाताळगंगा नदीचे शुद्ध पाणी दूषित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाताळगंगा नदीचे पाणी एमआयडीसीसह अनेक ग्रामपंचायतीमध्ये पिण्यासाठी वापरले जात आहे. या शुद्ध पाण्यात खोपोली नगर परिषदेच्या गटारातून वाहणारे दूषित पाणी व प्लास्टिक कचरा नदीत वाहत असल्याने अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. १०० कोटी रूपयांच्या भुयारी गटाराचे काम नगर परिषद करीत आहे. मात्र, या भुयारी गटाराचे सांडपाणी सुध्दा पाताळगंगा नदीत सोडणार का ? खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाणी दूषित होताना दिसून येत नाही ? अशा बेजबाबदार मुख्याधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्वरीत बदली करण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून पत्रकारांकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (एबीजेएफ) रायगड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी दिला आहे.

