* निवृत्त पोलिस पाटील व आदर्श पोलिस पाटील यांचा सत्कार
खालापूर / सुधीर देशमुख :- खालापूर पोलिस ठाणे येथे पोलिस पाटील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये निवृत्त पेालिस पाटील यांचा सत्कार, आदर्श पोलिस पाटील तसेच मयत पोलिस पाटील यांच्या कुटुंबाला निधी देण्याचा कार्यक्रम झाला.
लोहोप गावचे मयत पोलिस पाटील कै. मोहन पाटील यांच्या कुटुंबियांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, खालापुर तालुका पोलिस पाटील, खालापूर, रसायनी, खोपोली पोलिस ठाण्याकडून एकत्रिक रक्कम रूपये 1 लाख 49 हजार 500 रूपयांची आर्थिक मदत उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते मयत पोलिस पाटील कै. मोहन पाटील यांच्या पत्नी यांच्याकडे देण्यात आली.
तसेच प्रदिर्घ सेवा देवून निवृत्त झालेले उसरोली गावचे पोलिस पाटील खंडू पाटील, तोंडली पोलिस पाटील अनंत मलबारी, इसांबे पोलिस पाटील अनंत देवघरे, आसरोटी पोलिस पाटील हरिभाउ म-या पाटील यांचा सत्कार उपस्थित पोलिस अधिका-यांकडून करण्यात आला. जिल्हा बदली झालेले अंमलदार पो. शि. अभिमन्यू आहेरकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.
वर्षभरामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेले सावरोली गावचे पोलिस पाटील प्रमोद नारायण किळंजे यांना या वर्षीचा आदर्श पोलिस पाटील म्हणून सत्कार करून गौरविण्यात आले. त्यानंतर पोलिस पाटील यांनी त्यांच्यामध्ये घडवून आणलेल्या बदलाबाबत मनोगत व्यक्त केले व तदनंतर आणि डिवायएसपी विक्रम कदम यांनी पोलिस पाटीलांना मार्गदर्शन केले.
यावेळी डिवायएसपी विक्रम कदम, खोपोली पोलिस निरीक्षक शितल राऊत, खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार, रसायनी पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव व पोलिस पाटील आदी उपस्थित होते.
