मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रेलरची फूडकोर्ट हॉटेलला धडक

 


* अपघातात एका 19 वर्ष कामगारचा मृत्यू

* तीन कारला धडक बसल्याने कारचे नुकसान

खोपोली / खलील सुर्वे :- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शनिवार दि. ७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास किमी (KM) 34.700 फूडमॉल इन फूडकोर्ट हॉटेल येथे एक्सप्रेस-वे वरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने फूडकोर्ट हॉटेलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात या ट्रेलर समोरून बचावाचा प्रयत्न करणाऱ्या एका कामगाराचा ट्रेलर खाली दबून मृत्यू झाला असून या ट्रेलरने तीन कारला देखील जोरदार धडक दिली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून पुण्याहून मुंबईकडे जाणारा ट्रेलर (क्रमांक MH 46 BM 0343) वरील चालक बिपीन यादव (रा. सहागण, जि.जोनपूर, उत्तरप्रदेश) त्याच्या ताब्यातील ट्रेलर मुंबईच्या दिशेने चालवत असताना नियंत्रण सुटल्याने ट्रेलर फूडमॉल इन येथील हॉटेल फूडकोर्ट हॉटेलच्या एंट्री गेटच्या पहिल्या पिलरला जोरदार धडकून अपघात झाला. या अपघातात हॉटेल उडपी येथील काम करणारा इंद्रदेव पासवान (रा. सारसा बिहार) (वय 19 वर्ष) याचा ट्रेलर खाली येऊन मृत्यू झाला आहे. तसेच फूडकोर्ट येथील पार्किंग करीता लावण्यात आलेल्या कार (क्र. MH 05 EV 7843), (MH 14 LM 2880) व (MH 09 EM 381) वाहनांना ट्रेलरची धडक बसल्याने नुकसान झालेले आहे. सुदैवाने हॉटेलमधील अन्य प्रवासी व कामगारांना दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ट्रेलर हॉटेलच्या पिल्लरला न धडकता थेट हॉटेलमध्ये शिरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती हे विचार आल्यावर पायाखालची जमीन सरकून जाते.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलिस स्टेशनची यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलचे ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहचून यांनी मदतकार्य केले.


Post a Comment

Previous Post Next Post