खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातच नव्हे तर युवा वर्गांत मोबाईल वापरण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने अभ्यासावर परिणाम होतोच त्याचसोबत अनावश्यक आणि गैरप्रकार वाढू लागल्याने खोपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी युवा वर्गाला मोबाईलचा गैरवापर टाळण्यासंबंधी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत खोपोलीतील करियर कोचिंग क्लासेसच्या बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यंदाची बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल फोन न वापरण्याचा निर्धार केला. खोपोली पोलिस स्टेशनमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात निरीक्षक आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मोबाईल करियर कोचिंग क्लासेसचे संचालक डॉं. मुफद्दल शाकीर यांच्याकडे जमा केले. येणाऱ्या काही दिवसांत याहूनही अधिक संख्येने विद्यार्थी या आवाहनास प्रतिसाद देतील, असा विश्वासही व्यक्त केला.
खोपोलीचे पोनि शितल राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्व विद्यार्थी वर्गांला शुभेच्छा दिल्या असून अशा निर्धाराने त्यांचे अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित होऊन त्याचा परिणाम चांगल्या उत्तम रिझल्टवर होईल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत व्हरांबळे आणि पोलिस कर्मचारी प्रसाद पाटील यांच्या समवेत हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर हे देखील उपस्थित होते.