खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस?

 


* नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत 

* नगर परिषदेला जाग येणार तरी कधी?

* खोपोलीकर नागरिकांचा संतप्त सवाल

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि सामान्य नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून रात्री उशीरा कामावरून घरी परतणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांमध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. शहरातील अनेक मुख्य रहदारीचे रस्ते, बाजारपेठ, मटण व मासळी बाजार, तसेच अनेक मोक्याच्या ठिकाणी ही भटकी कुत्री मोठमोठ्या गटाने एकत्रितपणे उभी राहत असल्याने शाळेत जाणारी मुले, बाजारात कामानिमित्त येणारे नागरिक, महिला, सकाळी-संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरण्यास बाहेर पडणारे वयोवृध्द नागरिक या सर्वांना रस्त्यावरून चालतांना या भटक्या कुत्र्यांच्या भीतीचे व दहशतीचे एक प्रकारचे मोठे दडपण घेऊनच चालावे लागत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून दिवसा तसेच रात्रीच्या वेळी वाहनांचा पाठलाग करणे, अंगावर धावून जाणे आणि अचानक वाहनांच्या आडवे येऊन अपघाताला कारणीभूत ठरत आहे. कुत्र्याला चुकविण्याच्या प्रकारात आणि अंगावर वाहन गेल्याने गंभीर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न समोर आला आहे.

खोपोली नगर परिषदेच्या लोकसेवकांना नागरिकांची कोणतीच काळजी राहिलेली नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यांना फक्त मोठे पगार...दुपारी घरी जावून आरामाचे जेवण...कार्यालयात थंडगार एसीमध्ये चहा, कॉफीचा आनंद...भरभरून सुट्ट्या आणि सही करण्याचे काम...नागरिकांच्या समस्या नको ? शहरात अनेकदा कुत्र्यांनी लहान मुलांसह मोठ्यांवर हल्ला करून चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण त्यावर गांभिर्याने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात खोपोली नगर परिषद अयशस्वी ठरली आहे. खोपोली नगर परिषदेला जाग येणार तरी कधी? नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post