जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पनवेलमध्ये ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेचे उद्घाटन

 


* रायगड जिल्ह्यात ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेस’ सुरूवात

रायगड / प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचे स्वप्न आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. येथून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. त्यामुळे येथील हॉट स्पॉट शोधून आपल्याला सातत्याने काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण भारतात आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार संपुर्ण रायगड जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून पुढील १०० दिवसांच्या कालावधीत ‘क्षयरोग दुरीकरण मोहिम : १०० दिवस’ राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन एमजीएम रूग्णालय पनवेल येथे जिल्हधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, एमजीएमचे वैद्यकीय संचालक सुधीर कदम, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, जिल्हा क्षयरोग अधिकारी सचिन जाधव, पनवेल महानगरपालिका उपायुक्त डॉं. वैभव विधाते, पनवेल महानगरपालिका मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉं. आनंद गोसावी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉं. एस. दळवी, एमजीएम विद्यापीठाचे शाखाप्रमुख डॉं. जी. एस नरशेट्टी, तहसिलदार विजय तळेकर, आरोग्य अधिकारी डॉं. मनीषा विखे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, पनवेल महानगरपालिका ज्या पध्दतीने आरोग्य क्षेत्रात काम करते ते वाखणण्यासारखे असून अभिनंदनास पात्र आहे. आरोगयाच्या बाबतीत पनवेल स्वयंपूर्ण होण्याकरीता त्यांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल. याबरोबरच या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी, कोळी बांधव, विट्टभट्ट्या अशा सर्व भागांतील सर्वेक्षण केले जाईल. 

आयुक्त मंगेश चितळे म्हणाले पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नागरी क्षेत्रात आरोग्य सेवेची शंभर टक्के काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. यासाठी जिल्हाधिकारी जावळे यांचे व एमजीएम रूग्णालयाचे नेहमीच पालिकेला सहकार्य मिळत असते. याचबरोबर येत्या काळात महापालिकेचे 450 खाटांचे माताबाल संगोपन रूग्णालय तयार होणार यासाठी देखील सीएसआर फंडातून विविध कंपन्याचे सहकार्य आम्हाला मिळेल याची शाश्वती असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते  टीबी रुग्णांना सकस व पोषक आहाराच्या फूड बास्केटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सीएसआर फंडातून मदत करणाऱ्या पिडीलाईट, महानगर गॅस, दिपक फर्टीलायझर, ओएनजीसी उरण हिंदाल्को, जेएनपीए उरण अशा 'निक्षय मित्र’ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सीएसआर फंडामधुन देण्यात आलेल्या टीबी रुग्ण तपासणीसाठीच्या डिजिटल एक्स-रे मोबाईल व्हॅनचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी शपथ घेण्यात आली.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉं. सचिन जाधव यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविकामध्ये कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच डॉं. पोतदार सर यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post