खोपोलीत अतिक्रमण जोमात...नगर परिषद प्रशासन कोमात?

 


खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगरीत दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. जिथे पहावे तिथे वाढते अतिक्रमणाचे चित्र दिसून येत आहे. खोपोली नगर परिषद प्रशासन अखेर कार्रवाई करताना का दिसून येत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील अनेक दुकानदारांनी बेशिस्तपणे आपल्या दुकानाचे लोखंडी शेड, बोर्ड, सामान, गाडी महामार्गांच्या रस्त्यावर पार्किंग करीत असल्याने या चौकात दररोज सर्वसामान्य नागरिक, शाळकरी विद्यार्थी व वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अनेकांमध्ये वाद निर्माण होत आहेत.

तसेच खोपोली शहरातील मुख्य बाजार पेठेत रस्त्यांवर बांधलेल्या बिल्डिंगमधील दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली करीत मनमानी सुरु असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर दुकानाचे बोर्ड, पत्र्यांचे शेड, लोखंडी स्टॅंड, दुकानाचे सामान थाटामाटात लावण्यात आले आहेत. तसेच आता आठवड्याचा गुरुवार बाजार रोज भरतांना दिसून येत आहे. फुटपाथवर चहा, कपडे, वडापाव, गॅरेज, पानटपरी सारखी दुकाने बिनधास्तपणे मांडण्यात आली आहेत. भाजी मार्केट परिसरात तर पोलिस स्टेशनच्या संरक्षण भिंतीलगत असणाऱ्या रस्त्यावर हातगाड्या लावता-लावता आता झोपड्या बांधण्यात येत आहेत. काहींनी तर उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीच्या टॉवर खालीच दुकाने मांडल्याचे दिसून येत असून मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे येणाऱ्या रस्त्यांवर देखील हातगाड्या लावत झोपडे बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिळफाटा येथे तर एका बिल्डिंगमध्ये लोकप्रतिनिधीने अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. मात्र, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिक्रमणावर कार्रवाई करण्यात उदासीन आहेत ? कोणत्या नेत्यांच्या दबावाला बळी पडत आहेत ? नगर परिषद प्रशासनाच्या डोळ्यांदेखत शौचालय तोडले जात असताना त्यावर साधी कारवाई देखील केली गेली नाही ? अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्रवाई करता येत नसेल तर नगर परिषद प्रशासनाने प्रॉपर्टी कार्डचे वाटप करून त्यांना अधिकृत करावे ? कायदा हा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी व पत्रकारांसाठी राहिलेला आहे का ? चोरांना माफी  ईमानदारांना फाशी का ? असा संतप्त सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post