महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्यानेच महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्याबद्दल ना. रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला, त्यामुळे जनतेच्या डोळ्यात खोट्या प्रचाराची धूळफेक करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने पराभवाची धूळ चारली आहे. लाडकी बहिण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला महिलांनी चांगलाच धडा शिकवून महायुतीला ऐतिहासिक विजयाची भाऊबीज भेट दिली आहे, असे सांगत ना. रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.
बांद्रा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीचा महविजय ढोल वाजवून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ना. रामदास आठवले यांनीही ढोल वाजवून महायुतीचा विजय साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.
10 वर्षामध्ये 10 लाख कोटींपेक्षा जास्त निधी महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राकडून मिळालेला आहे. नरेंद्र मोदीजींनी गरिब, युवा, महिला, दलित, आदिवासी आणि ओबीसी या सर्वांसाठी काम केलेले आहे. या महाराष्ट्रातील जनतेले भरभरुन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. एकतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीच्या पध्दतीने नरेंद्र मोदीजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणुन टोमणे मारण्यात आले होते आणि त्यांचा परिणाम म्हणुन संजय राऊत सारखे जे नेते होते ते सातत्याने चुकीच्या पध्दतीने बोलत होते. त्यामुळे लोकांनी ठरविले की महाविकास आघाडीला धडा शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला एक मोठा धडा शिकविण्यात आला आहे. महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केलेले आहे. आम्हाला अपेक्षा होती 170 जागा मिळतील पण त्यापेक्षा जास्त 60 जागा जास्त मिळाल्या आहेत. महायुतीचे सरकार एक-दोन दिवसामध्ये स्थापन होईल. संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना दुसरा काही धंदा नाही आहे. त्यामुळे त्यांना फक्त आरोप करण्याचा धंदा आहे, असा टोला ना. रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.