* रायगड जिल्ह्यातील सातही मतदारसंघांवर महायुतीचे वर्चस्व
रायगड / मानसी कांबळे :- विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळविला आहे. महायुतीच्या विजयाने काँग्रेससह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. महायुतीच्या त्सुनामीने महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली आहे. रायगडातही महायुतीचा करीश्मा दिसून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मोठा प्रभाव 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर दिसून आला आहे.
पनवेल मतदारसंघामध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी विजय मिळवला असून, त्यांना १ लाख ८३ हजार ९३१ मते मिळाली. या ठिकाणी बाळाराम पाटील पराभूत झाले असून, त्यांना १ लाख ३२ हजार ८४० मते मिळाली आहेत. कर्जतमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विजय मिळवला असून त्यांना ९४ हजार ८७१ मते मिळाली. त्यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा ५६९४ मतांनी पराभव केला, ज्यांना ८९ हजार १७७ मते मिळाली आहेत. तर या मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन सावंत यांना ४८ हजार ९२९ मते मिळाली आहेत. उरणमध्ये भाजपचे महेश बालदी यांना ९५ हजार ३९० मते मिळाली असून, त्यांनी शेकापच्या प्रीतम म्हात्रे यांच्यावर विजय मिळवला आहे. म्हात्रे यांना ८८ हजार ८७८ मते आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर तिसऱ्या स्थानी असून त्यांना ६९ हजार ८९३ मते मिळाली आहेत.
पेणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांना हरवून भारतीय जनता पार्टीचे रविशेठ पाटील विजयी झाले आहेत. रविशेठ पाटील यांचा ६० हजार ६७७ मतांनी विजय झाला आहे. त्यांना १ लाख २४ हजार ६३१ मते मिळाली, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांना ६३ हजार ८२१ मते मिळाली आहेत. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी १ लाख १३ हजार ५९९ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना हरवले, ज्यांना ८४ हजार ३४ मते मिळाली आहेत. श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटचे अनिल नवगणे यांचा पराभव केला. महाडमध्ये शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा विजय झाला असून, त्यांनी २६,२१० मतांनी शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा पराभव केला.