* कर्जत-खालापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे 5761 मताधिक्याने विजयी
कर्जत / केपी न्यूज ब्युरो :- कर्जत विधानसभा मतदार संघात 2900 कोटी रूपयांचा आणलेला निधी... मतदार संघातील महिलांना 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेचा लाभ मिळावा, यासाठी घरोघरी जावून भरलेले अर्ज... कर्जत व खोपोली शहराच्या विकासाला दिलेले प्राधान्य... नियोजनबध्द प्रचार...यामुळे कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील जनतेने आमदार महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. या विजयाने आमदार महेंद्र थोरवे हेच कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील जनतेचे 'लाडके' आहेत, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदार संघात 20 नोव्हेंबरला मतदान झाले, त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. या विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर 189 मतदार संघात तिरंगी लढत पहावयास मिळाली. या मतदार संघात एकूण 3 लाख 18 हजार 742 मतदार असून त्यापैकी 2 लाख 40 हजार 10 मतदारांनी मतदान केले. या तिरंगी लढतीत महेंद्र थोरवे, सुधाकर घारे व नितीन सावंत यांच्यात लढत झाली. या लढतीत पहिल्या फेरीपासून ते 17 व्या फेरीपर्यंत अपक्ष उमेदवार यांनी 915 मतांची आघाडी कायम ठेवली, त्यानंतर 18 व्या फेरीपासून 26 व्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना खोपोली, खालापूरमधून आघाडी मिळाली आणि ती शेवटपर्यंत टिकून राहिली. यामध्ये महेंद्र थोरवे यांना एकूण 94 हजार 511 मतदान झाले. तसेच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना एकूण 88 हजार 750 मतदान झाले तसेच नितीन सावंत यांना एकूण मतदान 48736 झाले. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना 5 हजार 761मताधिक्य मिळाले व त्यांचा विजय झाला. यावेळी नोटाला 1 हजार 946 मते मिळाली. या मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. खालापूर व खोपोलीमधील कार्यकर्त्यांनी यशस्वी मेहनत घेवून आमदार महेंद्र थोरवे यांना विजय मिळवून दिला.
दुसरीकडे पनवेल मतदारसंघामध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी विजय मिळवला असून, त्यांना १ लाख ८३ हजार ९३१ मते मिळाली. या ठिकाणी बाळाराम पाटील पराभूत झाले असून, त्यांना १ लाख ३२ हजार ८४० मते मिळाली आहेत. उरणमध्ये भाजपचे महेश बालदी यांना ९५ हजार ३९० मते मिळाली असून, त्यांनी शेकापच्या प्रीतम म्हात्रे यांच्यावर विजय मिळवला आहे. म्हात्रे यांना ८८ हजार ८७८ मते आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर तिसऱ्या स्थानी असून त्यांना ६९ हजार ८९३ मते मिळाली आहेत.
पेणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांना हरवून भारतीय जनता पार्टीचे रविशेठ पाटील विजयी झाले आहेत. रविशेठ पाटील यांचा ६० हजार ६७७ मतांनी विजय झाला आहे. त्यांना १ लाख २४ हजार ६३१ मते मिळाली, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांना ६३ हजार ८२१ मते मिळाली आहेत. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी १ लाख १३ हजार ५९९ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना हरवले, ज्यांना ८४ हजार ३४ मते मिळाली आहेत. श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटचे अनिल नवगणे यांचा पराभव केला. महाडमध्ये शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा विजय झाला असून, त्यांनी २६,२१० मतांनी शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा पराभव केला.