माजी आ. सुरेश लाड यांना राजकारणातून संपवण्याचे काम सुधाकर घारे यांनी केले - राजेश लाड

 

कर्जत / मानसी कांबळे :- कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिलेले सुरेश लाड यांना राजकारणातून संपविण्याचे आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम रायगडची अदृश्य शक्ती अर्थात खा. सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांनी केले असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते राजेश लाड यांनी केला आहे. राजेश लाड हे माजी आ. सुरेश लाड यांचे भाऊ असून ते सद्या भाजपात काम करीत आहेत, ते आयोजित महायुतीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत असून आज महायुतीने पत्रकार परिषद घेत सुधाकर घारे यांनी केलेल्या अनेक आरोपांना जशाच तसे उत्तर दिले. अपक्ष उमेदवार असलेले सुधाकर घारे यांचा राजकीय जन्म हा 2014 साली झाला असून माजी आ. सुरेश लाड यांच्यामुळे ते आज राजकारणात दिसत आहेत. त्यांना सुरेश लाड यांनी जिल्हा परिषदेला निवडून आणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले. ते उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने त्यांनी सुरेश लाड यांना डावलून राष्ट्रवादीच्या काही बगलबच्चे यांना सोबत घेऊन खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सुरेश लाड यांना जाणूनबुजून डावलून त्यांना राजकारणातून संपविण्याचे काम केले. त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण केले. सुधाकर घारे हे नेतृत्व विश्वासघातकी असल्याचा आरोप राजेश लाड यांनी केला आहे.

लाड पुढे म्हणाले की, माजी आमदार सुरेश लाड हे भाजपात असून त्यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण ताकतीने कामाला लागलो आहे. यावेळी भाजप नेते सुनील गोगटे, संतोष भोईर आदींनी महायुतीची भुमिका मांडली. 

या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गट रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर, सुनील गोटीराम पाटील, भाई गायकर, भाजपचे सुनील गोगटे, राजेश लाड, वसंत भोईर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शिवसेनेचे भाई शिंदे, अॅड. संकेत भासे, संभाजी जगताप आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post