राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर

 

* महायुतीचे उमेदवार आ. महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर घणाघात!!

कर्जत / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड-रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे, तो वेळीच काढला पाहिजे अशी खरमरीत टीका कर्जत-खालापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आ. महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

आ. महेंद्र थोरवे यांनी आज प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी पोसरी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती आरोप करीत हिंम्मत असेल तर कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात उघड प्रचार करावा, असे आव्हान दिले. 

आ. थोरवे पुढे म्हणाले की, कर्जत-खालापूर विधानसभेमधील अपक्ष उमेदवार सुधाकर परशुराम घारे हे सुनील तटकरे यांचे पिल्लू असून पाप सुध्दा आहे. महायुतीचा धर्म इतर घटक पक्ष पाळत असताना तटकरे पाळत नाहीत, असा गंभीर आरोप करीत महाडमधील महायुतीचे उमेदवार भरत गोगावले, अलिबागचे महेंद्र दळवी आणि नासिकमधील उमेदवार सुहास कांदे यांच्याबाबतीत तटकरे कारस्थाने करीत असल्याचा आरोप थोरवे यांनी केला आहे. भ्रष्टाचार कसा करायचा हे तटकरे यांना चांगले माहिती आहे. माझ्या विकासकामांत तटकरे कसा खोडा घालतात याचा पाढाच त्यांनी पत्रकार परिषदेत वाचला. तटकरे यांना महायुतीतून हाकलून द्यावे असेही त्यांनी निक्षून सांगितले. अशा आत्मघातकी नेतृत्वाचा निषेध करीत असून त्यांच्यात गद्दारीचा डीएनए असल्याचा आरोपही महेंद्र थोरवे यांनी केला.

महायुतीतील एका उमेदवाराने इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप आणि सडकून टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केल्याने महायुतीत याचे काही पडसाद उमटणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post