खोपोलीच्या ढाण्या वाघाने खांद्यावर घेतले शिवधनुष्य!

 

* शिवसेना उबाठा कर्जत-खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉं. सुनील पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

खोपोली / फिरोज पिंजारी :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत - खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख तथा खोपोली शहर प्रमुख, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. 


शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व घटक पक्षाचे कर्जत-खालापूर मतदार संघाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवतीर्थ पोसरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी डॉं. सुनील गोटीराम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अल्पसंख्यांक आघाडी महिला महासचिव जैबुन्निसा शेख, रायगड जिल्हा उपाध्यक्ष फरीदा शेख, कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष मुस्कान सैय्यद, खालापूर तालुका संपर्क प्रमुख हमीद शेख, माजी खोपोली शहर प्रमुख राजन सुर्वे, माजी नगरसेविका प्रमिला सुर्वे व शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश केला. 


शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत यांना उमेदवारी जाहिर झाल्यापासून सुनील पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तिकीट नाकारण्यात आल्याने मी नाराज नसून पक्षाकडून मिळालेल्या वागणुकीवरून महेंद्र थोरवे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे महेंद्र थोरवे यांनी कर्जत-खालापूर मतदार संघात विकासगंगा आणली असून विकासरथ पुढेही असाच दौडत रहावा, यासाठी आपण आज पक्षप्रवेश करीत असल्याचे डॉं. सुनील पाटील यांनी सांगितले. 


डॉं. सुनील पाटील यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची मोठी ताकद वाढली असून खोपोली-खालापूर परिसरातून मोठ्या प्रमाणावर लीड देण्याचे आश्वासन सुनील पाटील यांनी दिले. नितीन सावंत यांचे नाव न घेता सुनील पाटील यांनी जोरदार टीका केली. 


Post a Comment

Previous Post Next Post