खालापूर / प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २०२४ च्या रणधुमाळीत सर्वच पक्षांचे उमेदवार जोरात प्रचाराला लागले आहेत. कर्जत-खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेद्र थोरवे यांनी देखील ५ नोव्हेंबर रोजी, महड येथील श्री क्षेत्र वरद विनायक मंदिरात गणरायाच्या चरणी नारळ वाढवून प्रचाराची सुरूवात केली.
या प्रसंगी प्रचाराला सुरूवात करताना आ. थोरवे यांनी जनतेशी संवाद साधत आपल्या कार्याची यादी मांडली. ते म्हणाले, मागील पाच वर्षात कर्जत-खालापूरचे नंदनवन करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मला जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा संधी मिळावी अशी विनंती आहे. दुसऱ्या विकासपर्वासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरतोय.
तसेच शिवसेनेने पुन्हा उमेदवारी देत विश्वास दाखवला आहे. यावर बोलताना सांगितले की, शिवसेनेने दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करीन. कर्जत-खालापूरकर नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे आणि महायुतीचा विजय निश्चित आहे, असे आत्मविश्वासपूर्वक विधान याप्रसंगी आ. थोरवे यांनी केले.
मागील कार्यकाळात कर्जत-खालापूरच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार, पायाभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. त्यामुळे मतदारांचा विश्वास आणि आशीर्वाद मिळावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महडच्या श्री वरद विनायकाच्या पवित्र स्थानी नारळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करताना गणरायाकडे सर्वसामान्य जनतेचे कल्याण आणि मतदारसंघाचा विकास घडवण्यासाठी साकडे घातले. या प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,पत्रकार व असंख्य संख्येने नागरिक उपस्थित होते.