खोपोली / प्रतिनिधी :- दैनंदीन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जनसामान्यांना वेळ नसतो, सगळ्याच आरोग्य चिकित्सा एका ठिकाणी होत नाहीत आणि यासाठी मोठ्या प्रमाणात पैसै खर्च करावे लागतात या बाबींचा अभ्यास करून लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने डॉं. रामहरी धोटे सभागृह खोपोली येथील लायन सर्विस सेंटरमध्ये भव्य आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते.
"कॅन्सर पेशंट एड असोसियेशनच्या" श्रीमती अनिता पीटर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून साधारणता 227 जणांची मोफत आरोग्य चिकित्सा केली गेली.
या शिबिरात नाक, घसा तज्ज्ञ आणि स्त्री रोग तज्ज्ञांकडून शिबिरार्थींची तपासणी केली गेली. इसीजी टेस्ट, ब्लड टेस्ट सोबत स्त्रियांसाठी स्तनाच्या कॅन्सर, पुरुषांसाठी तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरची टेस्ट केली गेली आणि आरोग्य विषयक सल्लाही देण्यात आला. जर या शिबिरातून कोणास एखादा आजार निष्पन्न झाल्यास त्याचा मोफत इलाज केला जाणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष दिपेंद्र बदोरिया यांनी दिली. या संपूर्ण शिबिराची तांत्रिक जबाबदारी सारीका शाह यांनी घेतली होती तर जिनय शाह यांनी समन्वयकाची भूमिका बजावली होती. शैली मेहता, चेतना केजरीवाल यांच्यासह लायन्स क्लबच्या सर्वच सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या शिबिराचे आयोजन केले गेले होते. बुज हास्य क्लब, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आदी संस्थानी देखील मोलाचे सहकार्य केले.