* लवकरच पक्षाला करणार अखेरचा 'जय महाराष्ट्र' ?
* शरद पवार गटालाही बसणार जोरदार धक्का ?
* अनेक नेते व कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या वाटेवर ?
खोपोली / फिरोज पिंजारी :- सध्या सर्वत्र निवडणुकीची धामधूम असून अर्ज छाननीनंतर आता माघारीची वाट पाहिली जात आहे. दरम्यान, विजयाचा गुलाल आपणच उधळावा यासाठी सर्वच पक्ष व उमेदवार जोरदार मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसून येत आहे. यातच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
यंदा विधानसभा लढवायचीच...उध्दवसेनेची मशाल कर्जत-खालापूर मतदार संघात पेटवावी, यासाठी डॉं. सुनील पाटील पेटले होते. पक्ष फुटीपासून कर्जत-खालापूर तालुक्यात उध्दवसेना वाढविण्यात सुनील पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मात्र, असे असतानाही पक्षश्रेष्ठींकडून तिकीट नाकारण्यात आल्याने सुनील पाटील पक्षाला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहचले असल्याची माहिती एका नेत्यांकडून देण्यात आली आहे.
डॉं. सुनील पाटील काही नेते व हजारो कार्यकर्त्यांसह तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातूनही काही नेते व कार्यकर्ते सुनील पाटील यांच्यासह लवकरच 'भगवा धनुष्य' खांद्यावर घेतील अशी शक्यता राजकीय समिक्षकांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, सुनील पाटील आणि विजय हे मागील अनेक निवडणुकांचे सूत्र झाल्याने सुनील पाटील आ. महेंद्र थोरवे, सुधाकर घारे व किरण ठाकरे यांच्यापैकी कुणाला साथ देणार? याकडे संपूर्ण कर्जत-खालापूर मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर खोपोली नगर परिषद निवडणुकीचा देखील धुरळा उडणार आहे. नगराध्यक्ष असताना सुनील पाटील यांनी खोपोली शहराच्या विकासाला चालना दिली होती. मात्र, मागील काही वर्षात खोपोली शहराच्या विकासाला खिळ बसली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार नाही तर नगराध्यक्ष म्हणून सुनील पाटील विराजमान व्हावेत, अशी खोपोलीकरांची इच्छा आहे. याच राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुनील पाटील कोणता झेंडा हाती घेणार ? आमदार म्हणून कुणाला निवडून आणणार? कुणाचा सुफडा साफ करणार? याकडे संपूर्ण कर्जत-खालापूर तालुक्याचे लक्ष लागू राहिले आहे.