महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होवून आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, दुसरीकडे कर्जत-खालापूर विधानसभा निवडणूक यंदा अतिशय चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजिप माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रायगड जिल्हा उपाध्यक्ष नितीन सावंत व खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, भाजपकडून कर्जत-खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, काँग्रेसकडून उल्हास देशमुख आदी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.
सध्या महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सामना होईल असे चित्र आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आजच्या घडीला सर्वच पक्ष व गटात इच्छुक दिसून येत आहेत. पण कुणा एकालाच उमेदवारी मिळू शकते...नेमका तो कौन? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीच्या नियमानुसार विद्यमान आमदार यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटातील इच्छुक उमेदवारांची गोची झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुध्दा हिच परिस्थिती दिसून येत आहे. कर्जत-खालापूर विधानसभा संघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ आहे. त्यामुळे यंदाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहण्याची दाट शक्यता राजकिय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. ही शक्यता गृहीत धरून नितीन सावंत व डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्यात तिकीटासाठी मोठी चुरस दिसून येत आहे.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते...राजिप माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी 'यंदा लढायचेच' असा निर्धार केल्याने राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. महायुतीत कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळेल का? असा प्रश्न असतानाच सुधाकर घारे 'तुतारी' हाती घेणार ? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सुधाकर घारे कदाचित 'तुतारी' हाती घेतीलही पण खरा प्रश्न आहे तो हा मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार यांच्या पक्षाला देण्यास उध्दव ठाकरे राजी होणार का? सुरत मार्गे गुवाहाटी गेल्यानंतर झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाची जागा प्रतिष्ठेची केल्याचे समजत आहे. अशा परिस्थितीत ही जागा 'तुतारी'ला सोडायला उध्दव ठाकरे मानणार का? शरद पवार मुरब्बी नेते आहेत...महाविकास आघाडीमध्ये त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो, तरीही नितीन सावंत, सुनील पाटील यांना टाळून नवीन उमेदवारासाठी उध्दव ठाकरे माघार घेणार का? की 'गेम करायचाच' असा निर्धार करीत सुधाकर घारे यांना 'डबल इंजन'चा सपोर्ट करायचा आणि बदला घ्यायचा, अशी रणनिती शरद पवार व उध्दव ठाकरे आखत तर नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्न सध्या मतदारांच्या मनात निर्माण झाले आहेत. निवडणूक जाहीर होवून अर्ज दाखल झाल्यानंतरच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. परंतु यंदा कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघामध्ये मोठी चुरस असल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज प्रवेश सोहळे आणि बैठका, मिटींग सुरू आहेत. सणासुदीची संधी साधत इच्छुक घराघरात की मतदारांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ऐवढे मात्र खरे.
- फिरोज पिंजारी
मुख्य संपादक
दै. कोकण प्रदेश न्यूज
दै. कोकण प्रजा & कोकण
प्रवाह, केपी न्यूज चैनल.