* महेंद्र थोरवे, सुधाकर घारे, नितीन सावंतला देणार टक्कर
कर्जत / प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट 'महायुती' म्हणून एकत्र लढत आहे. मात्र, कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आणि महायुतीला मोठा झटका दिला. आता त्यापेक्षा मोठा आघात देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते किरण ठाकरे सज्ज झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीचा विश्वासू व निष्ठावंत चेहरा म्हणून कर्जत-खालापूर तालुक्यात किरण ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. किरण ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात आहे. त्याच्या बंडाने महायुतीसोबतच महेंद्र थोरवे, सुधाकर घारे, नितीन सावंत यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजप नेते किरण ठाकरे यांनी आज शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह अपक्ष अर्ज दाखल केला. गेली अनेक वर्ष कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात भाजपवर अन्याय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर किरण ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवार, दि. 28 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता किरण ठाकरे यांनी एक भाजप व एक अपक्ष असे दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर्जत प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे दाखल केले. भारतीय जनता पार्टीने 'एबी' फॉर्म न दिल्यास आपण अपक्ष लढू, असे अर्ज दाखल केल्यानंतर भाजप नेते किरण ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.