* महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी वाजत-गाजत दाखल केला आपला उमेदवारी अर्ज
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्याने या निवडणुकीकरीता नितीन सावंत यांनी 28 ऑक्टोबर रोजी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने कर्जत-खालापूरमधील सर्वसामान्य जनता उपस्थिती होती.
कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयापासून सुरू झालेली रॅली जुना कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक - कर्जत बाजारपेठ - भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - नवीन प्रशासकीय भवन कर्जत येथे समाप्त झाली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते, परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जत-खालापूरकरांना दिलेले अभिवचन पूर्ण केले. ठाकरे म्हणाले होते की, मी निष्ठावंताला उमेदवारी देईल आणि अखेर नितीन सावंत यांच्या रूपाने उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिक या निवडणुकीत उभा केल्याने कर्जत-खालापूरच्या राजकारणात चांगलीच रंगत चढली आहे. खऱ्या अर्थाने मातोश्रींनी निष्ठावंतांला निवडणुकीच्या आखाड्यात उभा केल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, कॉम्रेड नेते गोपाळ शेळके आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना पक्षांमध्ये दोन गट पडल्यानंतर खऱ्या अर्थाने नितीन सावंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कर्जत-खालापुरात टिकून ठेवत निष्ठावंतांना बळ दिले, त्यामुळे नितीन सावंत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निष्ठावंतांनी मोठी गर्दी करीत शिवसेना महाविकास आघाडीचा विजय असो, अश्या जयघोषाने संपूर्ण कर्जत शहर दणाणून सोडले. ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत नितीन सावंत यांचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले, त्याचबरोबर मला मोठा हार क्रेनच्या साह्याने नितीन सावंत यांना घालण्यात आला. तसेच निष्ठावंत शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डीजेच्या ठेक्यावर ताल धरत आनंद उत्सव साजरा केला.