कर्जत / प्रतिनिधी :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाचा ऐतिहासिक भव्य भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ६ ऑक्टोंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला आहे. कर्जतमधील भीम अनुयायांचा अनेक वर्षापासुन सुरू असलेला संघर्ष हा प्रत्यक्षात साकार होत असल्याने या ऐतिहासिक भव्य भूमिपूजन सोहळ्यास कर्जत तालुक्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ढोल ताशाच्या गजरात भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर ऐतिहासिक भव्य भूमीपूजन सोहळ्याची सांगता रॉयल गार्डन येथे भव्य सभेत रूपांतर होऊन करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी ५ कोटीचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी मंजूर करून घेत आणि कर्जत नगर परिषदेतील फायर ब्रिगेड ऑफिस शेजारी असलेल्या जागेत दि. ६ ऑक्टोंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ऐतिहासिक वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. भूमिपूजन सोहळ्याची सुरूवात कर्जत शहरातील डॉं. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून झाली. कर्जत तालुक्यातील सर्व भीम अनुयायी यांनी ढोल ताशाच्या डॉं. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सुरभी ज्वेलर्स, श्रीराम ब्रीज, भूमिपूजन अशी रॅली काढली. त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ऐतिहासिक वास्तूचे भूमिपूजन झाल्यानंतर रॉयल गार्डन येथे भव्य सभा झाली. यावेळी संतोष भोईर, राहुल डाळिंबकर, हिरामण गायकवाड, नरेंद्र गायकवाड, सचिन भालेराव, ॲंड. सुमित साबळे, सिद्धार्थ सदावर्ते, अरविंद गायकवाड, मनोहर थोरवे, संकेत भासे, दिनेश कडू , तुषार कांबळे आदी मान्यवर तसेच तमाम भीम अनुयायी यांची उपस्थिती होती.
मी डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी दिलेला शब्द माझ्या नेतृत्वाने पूर्ण केला आहे. माझे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत येथे दि. ७ जानेवारी रोजी डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करील असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पूर्ण केल्याने आज दि. ६ ऑक्टोबर रोजी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाचे ऐतिहासिक भव्य भूमिपूजन हे माझ्या हस्ते झाले. याबद्दल मला माझ्या नेतृत्वावर सार्थ अभिमान आहे. मी व माझे नेतृत्वाने दिलेल्या शब्दाला आम्ही जागलो. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्व भीम अनुयायी माझ्या पाठीशी उभे राहाल असा विश्वास व्यक्त करतो.
- महेंद्र थोरवे (आमदार कर्जत - खालापूर विधानसभा.
आमदारांना माझा हॅट्स ऑफ...मुख्यमंत्री महोदय व आमदार थोरवे यांनी डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवनासंदर्भात दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे. तर बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे खाल्ल्या मिठाला जागणारी आपली जात आहे. तर आपले डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवन आता प्रत्यक्षात साकारणार असल्याने आपला समाज हा आमदार थोरवे यांच्या पाठीशी उभे राहून, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पाच वर्षासाठी आमदार थोरवे यांना निवडून देण्याचे आवाहन मी माझ्या तमाम भीम अनुयायी यांना करतो.
- राहुळ डाळिंबकर (माजी नगराध्यक्ष, कर्जत नगर परिषद).