* पत्रकार सुधीर गोविंद मानेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
* चौकशी न झाल्यास आंदोलन, उपोषणाचा इशारा
खोपोली / खलील सुर्वे :- खालापूर तहसीलचे निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांचे मागील अनेक वर्षापासून गैरप्रकार सुरू असून या प्रकाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युनायटेड जर्नालिस्ट फोरमचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक, पत्रकार सुधीर गोविंद माने यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करीत गरुवार, दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
खालापूर तालुक्यात मागील वर्षी एका श्रीमंत व्यवसायिकांनी अनेक एकर जमिनीत मोठा तलाव बांधला आहे. तलाव बांधण्यासाठी शासनाची कोणतीच परवानगी व महसूल विभागात रॉयल्टी न भरता पोकलेन, जेसीबी, हायवा, डंपरद्वारे भरमसाठ दगड, मुरूम, मातीचे अवैध उत्खनन करून लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान केले असता निवासी नायब तहसीदार यांनी श्रीमंत व्यावसायिकाला रॉयल्टीचे कोणतेच दंड का आकारले नाही ? खोपोली शहरातील काटरंग भागातील 2023 साली रॉयल्टी भरण्यात आली आणि 2024 साली डोंगर पोखरून भले मोठे उत्खनन करण्यात आले, त्यालाही दंड का आकारण्यात आला नाही ? यासह खालापूर तालुक्यात असंख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन व भराव होत असतांना त्यांनाही दंड का आकारण्यात आले नाहीत ? दगड खाणीहून दररोज हजारो ब्रास खरी, दगड, मुरूम, माती वाहतूक केली जाते. एक तीन ब्रासच्या चलनावर दिवसभर सर्रासपणे वाहतूक होत असताना यांची आरएनटींनी दंड का आकारले नाहीत ? तालुक्यात मोठे भ्रष्टाचार करून फ्लॅट, बंगलो,जमिनी ,गाडी घेणाऱ्यांची चौकशी होणार का? अशा प्रश्नांचा भडीमार करीत पत्रकार सुधीर माने यांनी चौकशीची मागणी लावून धरली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2022-2024 पर्यंत उत्खनन व भरावाच्या रॉयल्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला आहे...निवासी नायब तहसिलदार असताना खालापूर तालुक्यात न राहता बाहेरच्या तालुक्यात राहतात...आतापर्यंत त्यांच्याकडून देण्यात आलेल्या दाखल्यांची चौकशी करण्यात यावी, कागदपत्रे नसताना अनेक दाखले दिले गेले आहेत. तसेच गोरगरीब नागरिकांना महिनोमहिने दाखले मिळत नाहीत, याची माहिती घेवून चौकशी करण्यात यावी...जनमाहिती सुनावणी दरम्यान अर्जदारासोबत गैर वर्तन केले जाते...अनेकांनी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत, या सर्व तक्रारींची दखल घेण्यात यावी. तरी यासह विविध स्तरावर त्यांची सविस्तर चौकशी करण्यात यावी. अर्ज दिल्यापासून 15 दिवसांत चौकशी करण्यात आली नाही तर आम्ही खालापूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू आणि त्यानंतरही चौकशी करण्यात आली नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल. या दरम्यान माझ्या जीवास बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल, याची नोंद घेण्यात यावी असे निवेदन युनायटेड जर्नालिस्ट फोरमचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर माने यांनी तहसीलदार यांना दिले आहे.