परतीच्या पावसाने खोपोलीतील झेनिथ वॉटर फॉलने केला युवतीचा घात

 

खोपोली / प्रतिनिधी :- आज हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रायगडात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. नदी, नाले आणि धबधबे भरभरून वाहत होते. आपत्कालीन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला होता, त्याकडे दुर्लक्ष करून खोपोलीच्या झेनिथ वॉटर फॉल येथे खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवासी क्षीरसागर आणि त्यांचे नातेवाईक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सातजण त्या ठिकाणी अडकून पडले होते. पाण्याचा प्रवाह ओलांडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तीन महिला बुडू लागल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्राप्त झाली, त्यानुसार तातडीने त्यांनी घटनास्थळी जावून बचाव कार्य सुरू केले असता आयेशा शेख आणि मोनिका शिरसागर या महिलांना वाचविण्यात यश आले,  मात्र त्यापूर्वीच स्वप्नाली क्षीरसागर (वय-22) एक युवती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली. प्राप्त वर्णनानुसार त्या महिलेचा खोपोली पोलिस स्टेशन यंत्रणेने आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी कसोशीने शोध घेतला असता साधारणता एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना यश आले दुदैवाने ती युवती मृत अवस्थेत आढळली.

खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, खालापूर तालुका  उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शितल राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

झेनिथ वॉटर फॉल येथे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील,  खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शितल राऊत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांनी पावसाळ्यापूर्वीच दुर्घटना होऊ नये यासाठी रोप आणि चेन बॅरीकेडींगची उपाय योजना केली होती त्यामूळे मोठी दुर्घटना टळली. यंदा संपूर्ण पावसाळ्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगली होती मात्र परतीच्या पावसाने घात केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post