वास्तवाच्या जाणीवेतुनच सुंदर कविता जन्म घेते - प्रा. अशोक बागवे

 

वसई / नरेंद्र एच. पाटील :- कवीला शब्दाचे अर्थ, छटा आणि अनर्थ  माहिती असले पाहिजेत. नाहीतर त्याच्या कवितेतून वेगळा अर्थ निघू शकतो. उत्साहाने कविता करणे चांगले आहे परंतु त्या कवितेला प्रगल्भतेकडे घेऊन जाणे ही साधना आहे. रक्त , अश्रू , घाम आणि श्वास हे चार शब्द ज्या कवीला समजले त्याची कविता वेगळी होते. अनुभवाची सावली आणि वास्तवाची जाणीव ज्यावेळी होते, त्यावेळी सुंदर कविता जन्म घेते, असे प्रतिपादन चावडीवरील कविता प्रकाशन कार्यक्रमात बोलताना प्रा. अशोक बागवे यांनी केले.

डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या चावडीवरील कवितांच्या पुस्तकात पर्यावरणापासून ते विकास  पर्यतच्या कविता बघून आनंद झाला. कविता करताना मतितार्थ आणि भावार्थ एकत्र आल्यावर त्यातील गर्भितार्थ कवीला कळला पाहिजे. कविता केल्यावर ज्या कवीला कवितेच्या पदराची झुळूक लागते तो कवी नशीबवान समजला जातो. चांगल्या कवीची कविता ही विषयावर नसते तर ती त्याच्या मानसिकतेवर असते. साहित्य चावडीच्या आयोजकानी चावडीवरील कविता हे पुस्तक तयार करून चांगला पायंडा सुरु केला आहे, अश्या शब्दांत बागवे यांनी साहित्य चावडीचे कौतुक केले. 

  

यंग स्टार्स ट्रस्ट, विरार साहित्य चावडीचा ७ वा वर्धापन दिन विवा महाविद्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी चावडीवरील सादर झालेल्या कवितांच्या  चावडीवरील कविता ह्या पुस्तकाचे प्रकाशन तसेच कवी विक्रांत केसरकर यांच्या समर्पण या काव्य संग्रहाचे प्रकाशन कवी अशोक बागव, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष मुकेश सावे, पल्लवी बनसोडे, ज्योती बलिगा राव, अजीव पाटील, संगीता अरबुने, नम्रता माळी, सतीश सोलापूरकर, मुग्धा लेले, वंदना वर्तक, डिम्पल कौतुक मुळे यांच्या उपस्थितीत झाला.  कार्यक्रमापूर्वी कवी संमेलन झाले त्यात बहुभाषीक कवींनी आपल्या वेगवेगळ्या विषयावरील कविता सादर केल्या.    

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा कुरकुरे यांनी केले. त्यांनी 7 वर्षाच्या चावडीच्या वाटचालीचा आढावा घेतला.  वसईला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. वसईमध्ये साहित्याचे कार्यक्रम होत होते परंतु त्या मानाने विरारमध्ये कार्यक्रम कमी होत होते, त्यातूनच मग दर महिन्याला साहित्य चावडीचा कार्यक्रम आकाराला आला असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात बोलताना जेष्ठ कवी सतीश सोलंपूरकर यांनी सांगितले की, चावडी एक आणि 62 सरपंच हे पहिल्यांदा दिसत आहे. त्यातही ह्या कार्यक्रमाला आतापर्यंतचे सर्व सरपंच कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत हे विशेष. आतापर्यंत चावडीवर सादर झालेल्या कवितांचे एक सुंदर पुस्तक करून  चावडीने एक वेगळा पायंडा घातला आहे. या काव्य संग्रहात प्रेम कविता, भक्ती गीते, आईवरील कविता,  सामाजिक विषयावरील कविता अशा वेगवेगळ्या कविता एकत्रपणे वाचायला मिळतात हे ह्या संग्रहाचे विशेष आहे. प्रतिनिधीक स्वरूपाच्या ह्या कविता वाचल्यावर हे कवी पुढे जाऊन मोठे होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले. यावेळी साहित्यिक उमाकांत वाघ आणि विक्रांत केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. साहित्य जल्लोषचे सचिव संदेश दादा वनमाळी, दत्तात्रय देशमुख, सुरेखा धनावडे अशी अनेकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. दिपाली जाधव मिठबावकर, शुभम पाटील, मंजुषा गवई,  तानाजी पाटील,  किशोरी पाटील,  शिल्पा परूळेकर असे अनेकांचे हात कार्यक्रमाला लागले आणि कार्यक्रम यशस्वी झाला.

Post a Comment

Previous Post Next Post