* पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकण पाडा येथे पाटील कुटुंबियांचा खून की आत्महत्या?
कर्जत / नरेश जाधव :- नेरळ पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे चिकन पाडा येथे राहणारे ३५ वर्षीय मदन पाटील व त्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसेच मुलगा विनायक मदन पाटील यांचा मृतदेह घराजवळ असलेल्या ओहळमध्ये सापडल्याने कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती नेरळ पोलिस ठाण्यात मिळताच नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस टीम घटनास्थळी पोहचली. पोलिस टीमने घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात पाठविल्याचे समजते.
चिकनपाडा येथील पती, पत्नी व मुलगा यांचे मृतदेह हे घराजवळ असलेल्या ओहळात सापडून आल्याने व तिन्ही मृतदेहांवरील जखमा पाहता ही हत्या की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा अधिक तपास हा नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची टीम करीत आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये तीन मृतदेह सापडल्याने संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकन पाडा येथील पोशिर नदीवर दसपिंडाच्या विधीसाठी सकाळी १० वाजण्याचे सुमारास ग्रामस्थ जात असताना त्या ग्रामस्थांना पोशिर नदीला मिळणाऱ्या ओहळामध्ये एका ८ वर्षीय लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसुन आला. मुलाचा मृतदेह हा त्याच्या घरी आणला असता, घरात गणपती बापाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली असल्याचे दिसले. परंतु घरात 'त्या' मुलाचे आईवडील दिसत नसल्याने त्यांना फोन केला असता त्यांचे मोबाईल फोन हे घरात सापडून आले. मात्र, आईवडील घरात सापडून आले नसल्याने आईवडिलांनी मुलाला मारून आत्महत्या केली की काय ? असा संशय ग्रामस्थांना उपस्थित झाल्याने घराशेजारी असलेल्या ओहळामध्ये शोध घेतला असता, ज्या ठिकाणी लहान मुलाचा मृतदेह सापडला होता, त्या परिसरात काही अंतरावर एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत त्याच्या आईचा मृतदेह व वडिलांचा ही जवळपास पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत सापडून आला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. आईच्या डोक्यावर, मुलाच्या पाठीवर व वडिलांच्या डोक्यावर जखमा दिसून आल्याने घटनेची माहिती ही नेरळ पोलिस ठाण्याला देण्यात आली. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलिस टीमने घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह हे कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविले. पंचनामा झाल्यानंतर सदर तिन्ही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजले आहे. चिकनपाडा येथील घटनेची माहिती रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळताच व घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी व त्यांच्यासह पेण उपविभागीय पोलिस अधिकारी, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे यांनी घटनास्थळाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली आहे. चिकनपाडा येथील पती मदन जैतू पाटील ३५ वर्षीय, पत्नी ७ महिन्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील अंदाजे वय ३० व मुलगा विनायक मदन पाटील वय अंदाजे वर्ष ८ यांचे मृतदेह हे घराजवळ असलेल्या ओहळात सापडून आल्याने व तीनही मृतदेहांवरील जखमा पाहता खून की आत्महत्या ? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित होत असून या घटनेचा अधिक तपास रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची पोलीस टीम ही करीत आहेत. तर ऐन गणेशोत्सवामध्ये तिहेरी हत्या की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकनपाडा येथे घडली असल्याने संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे. पत्नी अनिशा मदन पाटील ही सात महिन्याची गरोदर असल्याने तिच्या गर्भात वाढणाऱ्या निष्पाप अभ्रकाचा जन्माला येण्याआधी त्या अभ्रकाचे जिवन संपले असल्याने संपूर्ण कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.