* कब्रस्तानाची तुटलेली संरक्षण भिंत दुरुस्तीसाठी पत्रकारांनी लेखी अर्ज करावा - मुख्याधिकारी पंकज पाटील
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेमध्ये असणाऱ्या हाळ बुद्रुक गावाच्या कब्रस्तानावर गेल्या अनेक महिन्यापासून नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र कब्रस्तान पाहिल्यावर दिसून येत आहे. खोपोली नगर परिषदमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. हाळ बुद्रुक गावाच्या कब्रस्तानाच्या संरक्षण भिंतीवर गेल्या काही महिन्याआधी भले मोठे झाड कोसळल्याने अनेक ठिकाणी भिंत कोसळली तर अनेक ठिकाणी भिंतीला मोठे तडे गेले आहेत. तसेच कब्रस्तानामध्ये लोखंडी शेडवर सिमेंटचे फुटलेले पत्रे, कुजलेल्या अवस्थेत असलेले लोखंडी बोर्ड, रूमचा कुजलेल्या अवस्थेत असलेला लाकडी दरवाजा, तुटलेले नळ आणि महाभयानक वाढलेले उंच उंच गवत जंगली झाडे संपूर्ण कब्रस्तानामध्ये झाल्याने कब्रस्तानामध्ये जाणे जिगरीचे झाले आहे. नगर परिषदेचे सफाई कर्मचारी या कब्रस्तानामध्ये साफसफाई करण्यासाठी येत नसल्याने कब्रस्तानाची अक्षरश: बिकट अवस्था झाली आहे. औषध फवारणी देखील केली जात नाही या वाढलेल्या गवतामुळे मयत झाल्यावर कबर खोदणे व दफन विधी करण्यासाठी मुस्लिम बांधवांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेल्या संरक्षण भिंतीच्या ठिकाणातून मोकाट जनावरे भटके कुत्रे कब्रस्तानामध्ये शिरूर कबरेची ना दुरुस्ती करतात तसेच अनेकदा कबरमध्ये जनावरे अडकून पडतात आणि कबरेची ना दुरुस्ती होते. पावसाळ्याचे दिवस सुरू असून गावातील एखादी मयत झाले की दफनविधी करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांसमोर मोठा प्रश्न उपस्थित राहत असल्याचे बोलले जात आहे.
खोपोली नगर परिषदेला एकापेक्षा एक महारथी कामचुकार अधिकारी लाभल्याने खोपोली शहराचा अक्षरक्ष: सत्यानाश झाला आहे. जागोजागी घाणीचे साम्राज्य, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, भटके कुत्रे, मोकाट गुरे, बिल्डरांचे सांडपाणी रस्त्यावर, दिवसेंदिवस वाढते अतिक्रमण, अनधिकृत हॉस्पिटल, अनधिकृत मेडिकल, शाळेच्या धोकेदायक इमारती, अनधिकृत शाळा, भाजी मार्केटमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण, भाजी मार्केटची धोकेदायक इमारत, नगरपरिषदेची गळती इमारत, घरपट्टी-पाणीपट्टीची समस्या, शौचालय चोरीला जाणे, शौचालयांची बिकट अवस्था यासह डोंगरभर समस्या शहरात असतांना मुख्याधिकारी साहेब कोणाच्या कामात व्यस्त असतात? हाच आहे का खोपोली शहराचा विकास? विकास करता येत नाही तर अशा अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन आपल्या स्वतःचे नवीन काम धंदे सुरू करावे? असा संतप्त सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे.
दगड रेतीला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या दर्जेच्या कामाबाबत सुरूवातीपासूनच मुस्लिम बांधवांमधून बोंबाबोंब सुरु असतांना त्यावर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. मात्र, कब्रस्तानाची संरक्षण भिंत व झालेला गवताचा जंगल या समस्याची माहिती पत्रकारांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पंकज पाटील व बांधकाम विभागाचे अभियंता अनिल वाणी यांना दिली असता पत्रकारांनी लेखी अर्ज द्या, कारण पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात आणि ऑडिटच्या वेळी आम्हाला दाखवायला मिळतो अशी माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील व बांधकाम अभियंता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अर्ज दिला नाही तर मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची तुटलेली संरक्षण भिंत व इतर कामाची दुरुस्ती होणार नाही का?जनतेच्या समस्या नगर परिषदेच्या निदर्शनास पत्रकारांनी आणली की पत्रकारांनी लेखी अर्ज करायचा का? अर्ज न करता शहराचा विकास करता येत नाही का? विकास कामे करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी आतापर्यंत शहरातील जनतेचे किती अर्ज घेतले याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील 'ऑन कॅमेरा' देणार का? पत्रकारांनी अर्ज केल्यावर आता नगर परिषदेचे मुख्याधिकारी समस्यांवर लक्ष देणार का? खोपोली शहरात सुरू असलेल्या भुयारी गटाराचे काम होण्यासाठी खोपोलीकरांचे सहमती पत्र पंकज पाटील साहेबांनी घेतले का? असा सवाल पत्रकारांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलन, उपोषण, जलसमाधी, आत्मदहन केल्यावरच खोपोली नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता कब्रस्तानाची संरक्षण भिंत व इतर कामांची दुरुस्ती करणार का? खोपोली नगरपरिषदेला जाग येणार तरी कधी? नागरिकांना सोयी-सुविधा मिळणार तरी कधी ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.