वसई / प्रतिनिधी :- यंदाच्या ३५ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजना बाबत तयारीची गणेशोत्सवानंतर होणारी पहिली सभा शनिवार दि. २२ सप्टेंबर २०२४ सायं. ७.०० वा. क्रिडामंडळ, वसई येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत जानेवारी २४ ते आतापर्यंतच्या काळात दिवंगत झालेले कार्यकर्ते, हितचिंतक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी सर्व स्पर्धा विभाग प्रमुख, कार्यकर्ते यांचे स्वागत करुन ३५ व्या कला क्रिडा महोत्सवाच्या आयोजनाच्या दृष्टीने सर्वांना तयारी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावर्षी कुस्ती, ज्युदो कराटे व दहिहंडी या खेळांच्या नविन स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ३५ व्या वर्षानिमित्त स्मरणिका छापण्यात येणार असुन त्यामध्ये कला क्रिडासंदर्भातील उपयुक्त माहिती व लेख एका महिन्यात देण्याचे आवाहन केले.
यावेळी अनेक स्पर्धा प्रमुख व कार्यकर्त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या अडचणी व त्यावरील उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. तसेच यावर्षी स्पर्धेचे प्रवेश अर्ज ॲानलाईन पद्धतीने करण्यासाठी योजना आखत असल्याचे सांगितले.
यावर्षी नविन आलेल्या कार्यकर्त्यांपैकी हेमंत बर्वे व ध्रुव बर्वे यांनी स्क्वॅश हा नविन खेळ सुरु करण्याचे सुचविले व त्याच्या आयोजनाची जबाबदारीही स्विकारली.
सभेस कला प्रमुख अनिल वाझ, क्रिडा प्रमुख विजय चौधरी व माणिकराव दोतोंडे सर, सहसचिव केवल वर्तक, देवेंद्र दांडेकर, राजेश जोशी, प्रशांत घुमरे,ज्युड डिसोझा यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिल्याच सभेला इतकी उपस्थिती व साधक बाधक चर्चा झाल्याने कार्यकर्त्यांमधे मोठा उत्साह दिसुन आला.