* हाळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात?
खालापूर / प्रतिनिधी :- नियोजनशून्य विकास हे आपल्याकडील ग्रामीणकरणाचे व्यच्छेदक लक्षण आहे. डेंग्यूसह इतर अनेक साथींच्या रोगांचे सामाजिक आणि पर्यावरणीय कारणही याच लक्षणात दडलेले आहे. मात्र, त्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने अनारोग्य वाढले आहे. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव हे त्याचे ठळक उदाहरण. आज बहुतेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. ग्रामपंचायतीमध्ये तर जागोजागी अस्वच्छता आढळते. सार्वजनिक स्वच्छतागृहे, गटारे तुंबलेली असतात, बांधकामांच्या ठिकाणांवर राडारोडा असतो, पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे घरोघरी पाणी साठविले जाते. ही सारी ठिकाणे डासांच्या पुनरुत्पादनाची आहेत. डेंग्यूचे मूळही तेथेच आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेचच अशा सर्व ठिकाणांचा वेध घेऊन प्रतिबंधात्मक फवारणी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवून घरोघरी माहिती पोहोचविण्याचीही आवश्यकता आहे, पण याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
हाळ खुर्द ग्रामपंचायतीचा कारभार अतिशय भोंगळ असल्याचे चित्र दिसून येत आहे. तुंबलेल्या गटाराचे पाणी ग्रामस्थांच्या घरासमोर साचले असल्याने दिसून येत आहे. हाळ गावातील खालच्या अळीतील जामा मस्जिद ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत असणारी गटारे घाणीने भरल्याने गटारीचे सांडपाणी तुबूंन राहत असून गेल्या एक आठवड्याभरापासून कर्जीकरांच्या राहत्या घरासमोर सांडपाणी साचून डबकी तयार झाल्याचे कर्जीकर कुटुंबाकडून बोलले जात आहे. पावसाळा सूरू होण्याआधी पासून हाळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडे गटार स्वच्छ करण्यासाठी तोंडी तक्रार करीत विनंती करण्यात आली होती. आज करतो, उद्या होईल असे सांगून दिवस ढकलण्यात आले. गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या सणापूर्वी लोकप्रतिनिधी व लोकसेवक यांनी या तुंबलेल्या गटाराची पाहणी केली होती, पण पाहणी केल्यापासून आजपर्यंत कोणतीच उपाययोजना न करता गटार ही स्वच्छ केले नाहीत. त्यामुळे आमच्या मोहल्यात प्रचंड दुर्गधी पसरली असून गटाराचे सांडपाणी आमच्या राहत्या घरासमोर साचून डबकी तयार झाल्याने वाढणाऱ्या डासांमुळे हत्तीरोग, तर स्वच्छ पाण्यावर वाढणा-या डासांमुळे डेंगू, मलेरियासारखे अनेक रोगराई पसरून आमचे आरोग्य धोक्यात आले आहेत. गटार स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीला लाखों रुपये खर्च येणार आहे का ? आम्ही ग्रामपंचायतीला कर भरत नाही का ? लोकप्रतिनिधी व लोकसेवक फक्त कार्यकर्त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आहेत का ? या गटाराचा वापर फक्त आम्हीच करतो का ? असा संताप व्यक्त करीत कर्जीकर कुटूंबानी पत्रकारांना माहिती दिली.
कर्जीकर पुढे म्हणाले की, आम्ही लवकरच रायगड जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देणार आहोत. ग्रामपंचायतीच्या परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे ढिगारे साचलेले आहेत. या गटाराचे सांडपाणी गटारामध्ये थांबून ओव्हर फ्लो झाल्याने आमच्या राहत्या घरासमोर साचले आहे. आम्हाला घरी राहणे मुश्किल झाले आहे. ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रार करूनही ग्रामपंचायत आमची दखल घेत नाही. त्या दुर्गंधीमुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंगू, मलेरीया यासह अनेक रोगराईने आधीच तोंड वर काढले आहे. आमच्या कुटुंबांना या रोगराईची लागण झाल्यावर ग्रामपंचायत लक्ष देणार का ? गाव स्वच्छ रोगराईमुक्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही का ? लोकसेवक व लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देऊन निघून जाणार आणि काही घटना घडल्यावर व्हिडिओ, फोटोमध्ये येण्यासाठी पुढे पुढे येणार का ? आम्हाला दररोज या साचलेल्या सांडपाण्यातून प्रवास करावा लागत आहे. आमच्या समस्यांवर ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. उद्यापर्यंत हे गटार स्वच्छ करण्यात आले नाही तर आम्ही सर्व कुटुंब गटविकास अधिकारी यांच्या दालनाबाहेर हे गटाराचे सांडपाणी टाकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


