वसई / नरेंद्र एच. पाटील :- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एसपी जुनियर कॉलेज जूचंद्र, वसई येथे 27 सप्टेंबर रोजी थोर देणगीदार व शिक्षणप्रेमी गोपीनाथ कृष्णाजी म्हात्रे उर्फ म्हात्रे बाबा यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
म्हात्रे बाबा व गावडे बाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व पुष्पहार अर्पण करून स्वागत गीताने व रयत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचा परिचय प्रदीप पाटील सर यांनी करून दिला. कार्यक्रमामध्ये गोपीनाथ कृष्णा म्हात्रे यांचे ज्येष्ठ पुत्र विवेकानंद म्हात्रे व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जितेंद्र भोईर सर यांनी म्हात्रे बाबांच्या आठवणी सांगितल्या. विद्यालयाचे प्राचार्य व्ही. यू. जगताप सर व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक एम. ए. म्हस्के यांनी देखील म्हात्रे बाबांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी देखील म्हात्रेबाबांच्या जीवनावर भाषणे केली.
या कार्यक्रमात म्हात्रे कुटुंबीयांमार्फत प्राचार्य जगताप यांचा रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार केला. तसेच भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकले स्पर्धेमध्ये विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
म्हात्रे कुटुंबीयांमार्फत सर्व विद्यार्थ्यांना बुंदी लाडूचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य विनय पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष विवेकानंद पाटील, सदस्य जितेंद्र भोईर सर, निवृत्त शिक्षिका प्रगती घरत मॅडम, मिलिंद पाटील, शकुंतला म्हात्रे, नयना योगेंद्र म्हात्रे व सर्व म्हात्रे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हात्रे सर यांनी केले व आभार एन. डी. गवळी सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पाटील मॅडम यांनी केले.