वसईतील सक्षम पत्रकारांची दुसरी पिढी घडवण्यात बाबरेकर सरांचे मोठे योगदान - अनिलराज रोकडे

 


* ज्येष्ठ पत्रकार बाबरेकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वसई / प्रतिनिधी :- सन 1980 च्या दशकात आपली शिक्षकी सेवा विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या रूपात सांभाळून, प्रामाणिक आणि ध्येयवादी पत्रकारिता साकारणारे माझे गुरुतुल्य ज्येष्ठ पत्रकार हरिहर बाबरेकर सर यांनी एक चांगले सहकारी आणि मित्र होऊन वसईतील सक्षम पत्रकारांची दुसरी पिढी घडविण्यात मोठे योगदान दिले आहे. वसईतील पत्रकारांच्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधित्व करताना, पत्रकारितेत सचोटी, संयम आणि समतोल कधीच ढळू द्यायचा नाही. हा सात्विक संस्कार त्यांनी आपल्या वाटचालीतून आम्हा पत्रकारांना  दिला. आम्ही आजवर पत्रकारितेत छोटे मोठे योगदान देत जे तगून आहोत, त्याचे श्रेय बाबरेकर सर यांना द्यायला हवे, अशा शब्दांत वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा कोमसापचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी बाबरेकर सर यांना शब्दसुमनांजली अर्पण केली.


वसईतील ज्येष्ठ पत्रकार हरिहर बाबरेकर (वय 81) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले होते. गुरुवारी सकाळी दहा वाजता वसईतील पाचुबंदर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत ज्येष्ठ पत्रकार रोकडे यांनी बाबरेकर यांच्या वाटचालीचा परामर्श घेऊन, त्यांची कृतज्ञता आपल्या भाषणात व्यक्त केली. यावेळी वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अशोक मुळे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र एच. पाटील, विजय खेतले, चंद्रकांत भोईर, मनीष मात्रे,  सीए अनादी भसे, उद्योजक अनिल जाधव आदी उपस्थित होते. तत्पूर्वी निवासस्थानी राज्याच्या आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा), माजी आमदार विवेक पंडित, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश नेते मंदार भानुशे, निवृत्त पोलिस निरीक्षक रामकिशन रेनगुंटवार, न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शोभना वाझ, भाजपचे मुकुंद मुळे, शिवसेनेचे मिलिंद खानोलकर, शिक्षिका पल्लवी चौधरी, माजी शिक्षक मुकुंद भिडे, नारायण उर्फ छगनशेठ नाईक, नितीन म्हात्रे, जयंत देसले, अरविंद म्हात्रे, मिलिंद म्हात्रे यांनी बाबरेकर सर यांचे अंत्यदर्शन घेतले. 

बर्वे एज्युकेशन संचालित न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेसाठी बुधवारचा दिवस अतिशय दुर्दैवी ठरला. या संस्थेचे 45 वर्षाहून अधिक काळ सचिव म्हणून सेवाभावी कार्य केलेले शिक्षण महर्षी सुरेश वायंगणकर यांचे निधन सकाळी सात वाजता झाले. तर याच शाळेच्या शिक्षिका श्रीमती कुमुद अनंत दांडेकर (वय ९४) यांची याच दिवशी दुपारी प्राणज्योत मावळली.  तसेच या शाळेत तीस वर्ष विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविलेले, ज्येष्ठ पत्रकार बाबरेकर सर यांचे सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. आज त्यांचे सुपुत्र वैभव यांनी अग्नी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Post a Comment

Previous Post Next Post