कर्जतमध्ये महाविकास आघाडीला खिंडार

 

* उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुरूंग 

* आमदारांच्या जुन्या सहकाऱ्यांची शिवसेनेमध्ये घरवापसी 

* विधानसभेच्या विजयाची नांदी...आ. महेंद्र थोरवेंची ताकद वाढली 

कर्जत / प्रतिनिधी :- रविवार, 15 सप्टेंबर 2024 रोजी बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे सायंकाळी 6.30 वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आ. महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ तात्या जाधव, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कर्जत शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते, शहर समन्वयक सुदेश देवघरे, उपशहर प्रमुख प्रसाद डेरवणकर, नगरसेविका प्राची डेरवणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोज जाधव, राकेश शेट्टी, दिनेश वाघमारे आदींनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. 

याप्रसंगी बोलताना आ. महेंद्र थोरवे म्हणाले की, आपण सर्वजण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण आज शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो. अडीच वर्षापूर्वी सत्तांतर झाले. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षातील विकासकामांचा जर झंझावात संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना कर्जत मतदारसंघाचा आमदार या नात्याने ज्याप्रमाणे मनुष्य जन्म पुन्हा नाही त्याप्रमाणे मला मिळालेल्या आमदारकीचे सोने करण्याचे काम मी सुरू केले व गेली अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत शहरासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.


राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जतचे नंदनवन करण्याची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त निधी हा कर्जतच्या विकासासाठी आणण्याचे ठरवले. यामध्ये कर्जतमध्ये असणारी वाढती लोकसंख्या विचारात घेता कर्जत शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असे यासाठी 57 कोटी रुपयांची वॉटर स्कीम कर्जत शहरासाठी मंजूर केली व ही संपूर्ण कर्जतकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया आ. थोरवे यांनी व्यक्त केली. 

आ. थोरवे पुढे म्हणाले की, आज माझे जुने सहकारी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करतात ही माझ्यासाठी खूप आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आपणा सर्वांचा शिवसेनेमध्ये योग्य तो मानसन्मान राखला जाईल व सर्व सहकाऱ्यांना विचारात घेऊन आपण एकत्रितपणे पुढील काळात शिवसेनेसाठी कार्य करू यात असा आशावाद आ. थोरवे यांनी व्यक्त केला.


याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप, कर्जत खालापूर संघटक शिवराम बदे, शिवसेना रायगड जिल्हा संघटक अरुण देशमुख, सल्लागार सुनील रसाळ तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post