* माझ्या मृत्यूला जिल्हाधिकारी किशन जावळे, खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड जबाबदार राहतील - अलका चव्हाण समेळ
खालापूर / विशेष प्रतिनिधी :- शेजारील रिसोर्ट मालकाकडून मागील 3-4 वर्षापासून अन्याय होत असताना खालापूर तहसील प्रशासन बघ्याची भुमिका घेत असल्याने व मागील काही वर्षापासून अडीच एकर शेतीचे नाहक नुकसान होत असल्याने संतापलेल्या...हतबल झालेल्या...शेतकरी महिलेने आपल्याच शेतात स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी महिला अलका चव्हाण समेळ जलसमाधी घेण्यास निघाल्या ही होत्या, पण अप्पर तहसिलदार पूनम कदम यांनी 8 दिवसांत प्रातांधिकारी यांच्याकडे बैठक लावून तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने प्रशासनास मुदत देत आपले आंदोलन त्यांनी तात्पुरते मागे घेतले आहे. पण आठ दिवसांत योग्य तो निर्णय झाला नाही... प्रशासनाने पुन्हा फसवणूक केल्यास...कुणालाही न सांगता आपण आपले जीवन संपवून टाकू आणि माझ्या मृत्यूला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, तत्कालीन खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड जबाबदार राहतील, असा इशारा अलका चव्हाण समेळ यांनी शेकडो नागरिक, प्रसारमाध्यमे, पोलिस प्रशासन व तहसील अधिकारी यांच्या उपस्थितीत दिला आहे.
अलका चव्हाण समेळ यांनी 10-15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध शासकीय कार्यालये व अधिकारी यांना निवेदन देत 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, अलका चव्हाण समेळ यांच्या जिवाची पर्वा प्रशासनास नसल्यामुळे नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्यासह एकाही वरिष्ठ अधिकारी व पोलिस प्रशासनाने अलका चव्हाण समेळ यांची समस्या...त्यांची तळमळ जाणून घेतली नाही. नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी तर त्यांनी काय करायचे करू द्या, आम्ही आमचे काम केले आहे...अशी आडमुठी भुमिका घेतल्याने अखेर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अलका चव्हाण समेळ यांच्यावर जलसमाधी घेण्याची वेळ आली होती.
अलका चव्हाण समेळ जलसमाधी घेणार असल्याने त्यांच्या खालापूर तालुक्यात येणाऱ्या पाली बुद्रुक येथील फार्म हाऊसवर सकाळपासूनच पोलिस प्रशासनासह नातेवाईक, मित्र मंडळी, शेतकरी नेते, विविध राजकीय पक्षाचे नेते, पत्रकार आदी उपस्थित होते. पण खालापूर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मात्र अलका चव्हाण समेळ यांच्या मृत्यूची वाट पाहत कार्यक्रमांचा आनंद साजरा करीत होते. 4-5 तास प्रशासनाची वाट पाहिल्यानंतर अखेर अलका चव्हाण समेळ यांनी आपल्या आईसह शेतीचा रस्ता पकडत जलसमाधीचा निर्णय पूर्णत्वास नेण्याचा निश्चय केला. तेव्हा कुठे कुंभकर्ण झोपेत असलेले खालापूर तहसील प्रशासन व कर्जत प्रातांधिकारी खडबडून जागे झाले व अप्पर तहसिलदार पूनम कदम यांनी अलका चव्हाण समेळ यांचे फार्म हाऊस गाठले. चव्हाण यांच्या मागण्यांवर लवकरच बैठक घेवून तोडगा काढण्यात येईल, असे पत्र देत 8 दिवसांची मुदत मागण्यात आली. अधिकारी व उपस्थितांनी समजूत काढल्यानंतर अलका चव्हाण समेळ यांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली. पण आठ दिवसांत योग्य तो निर्णय झाला नाही... प्रशासनाने पुन्हा फसवणूक केल्यास...कुणालाही न सांगता आपण आपले जीवन संपवून टाकू आणि माझ्या मृत्यूला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, तत्कालीन खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड, धनदांडगा जबाबदार राहतील, असा इशारा अलका चव्हाण समेळ यांनी दिला आहे.