* रिसॉर्टच्या तलावामुळे खालापूर तालुक्यात मराठी चव्हाण शेतकरी कुटुंबाची शेती पाण्याखाली ?
* परप्रांतीय व्यावसायिकांच्या दादागिरीमुळे मराठी कष्टकरी शेतकरी कुटुंबावर आत्महत्येची वेळ?
* अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे दोन वर्षापासून मराठी शेतकऱ्याच्या जमिनीचे अतोनात नुकसान
खालापूर / खलील सुर्वे :- राज्यात औद्योगिकरणात प्रसिद्ध असणाऱ्या खालापूर तालुक्यात गेल्या काही वर्षापासून 'क्लास वन' अधिकारी तालुक्याला लांबल्याने विकास गंगेच्या पातळीत कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. तालुक्यातील गावागावातील डेव्हलपमेंटमध्ये प्रगती होत शेतकरी कमी झाले आणि परराज्यातील आलेले श्रीमंत व्यावसायिकांचा सुळसुळाट झाला आहे. श्रीमंत व्यावसायिकांच्या डेव्हलपमेंटमध्ये वाढ होण्यासाठी त्यांना कोणताच त्रास होऊ नये यासाठी 'क्लास वन' अधिकारी जीवाची बाजी लावत असल्याची तालुक्यात चर्चा सुरु आहे. श्रीमंत व्यावसायिकांनी नियम मोडून नियमांची पायमल्ली करीत शेततलाव खोदणे, इमारतीचे बांधकामे करणे, शेतकऱ्यांच्या शेतीतून रस्ते बनविणे, उत्खनन करणे, अतिक्रमण करीत केल्यास डेव्हलपमेंट करतांना हे डेव्हलपमेंट न थांबविता त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी 'क्लास वन' अधिकारी जीवाची बाजी लावत श्रीमंत व्यावसायिकांना सहकार्य करा, असे प्रवचन देतात. मराठी शेतकऱ्याच्या शेतात श्रीमंत व्यावसायिकांच्या तलावाने शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसानीची तक्रार येताच कागदी खेळ खेळत कार्रवाई न करता कोर्टात जाण्याचे प्रवचन गरीब, कष्टकरी शेतकऱ्यांना देतात. नियम, कायदा फक्त आणि फक्त गरीब मराठी शेतकरीसाठी राहिला आहे का? श्रीमंत व्यावसायिकांचा व्यवसाय वाढविण्यासाठी मराठी शेतकऱ्याच्या जमिनीतील पिकाचे नुकसान झाल्यावर मराठी शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का? खालापूर तालुक्यात मराठी शेतकऱ्यांना दाद देणारा मराठी माणूस राहिलाच नाही का? असा संतप्त सवाल मराठी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर खालापूर तालुक्यातील वावर्ले तलाठी सजा अंतर्गत येत असलेल्या पाली बुद्रुक या भागात कोकणातील मराठा चव्हाण कुटुंब १९७७ साली वसले असून त्यांची १० एकर जागा आहे. हा भाग कर्जत तिघर अभयवाडी व खालापूर असा दोन्ही तालुक्याच्या सीमेवर असून चव्हाण यांची अधिक जागा ही खालापूर तालुक्यात येत आहे. दत्ताराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुलोचना चव्हाण यांनी शेतीची धुरा सांभाळली. खालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ९४, ९५ व ९९ अशी शेत मिळकत सुलोचना चव्हाण, अलका चव्हाण समेळ, किशोर चव्हाण, नरेश चव्हाण, सरिता चव्हाण, सायली गावकर यांच्या नावावर आहे. मराठी शेतकरी चव्हाण कुटुंबाची शेतीशी नाळ जोडली असून अन्नदाता आपली माता समजून अनेक वर्षे संकटांवर मात करीत हे कुटुंब शेती सांभाळून आहे. ७७ वयाच्या सुलोचना चव्हाण पासून तर घरात इंजिनियर, पोलीस निरीक्षक, खाजगी नोकरीत उच्च अधिकारी अशी पद सांभाळणारी ही मराठी माणसे आजही कष्टकरी शेतकरी ओळख असलेली मराठी माणसे शेतीत रमतात. मात्र चव्हाण कुटुंबाच्या शेती लगतच वीरेन आहुजा यांचा ऑलेंडर (सॉल्ट) रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये आहुजा यांनी सन २०२१-२२ दरम्यान स्वत:च्या जमिनीत काही बदल करत तलावाची निर्मिती केली. पोकलंड मशीनच्या सह्याने माती दगड फोडून तलावाची खोली व बंधार्यांची उंची वाढविण्यात आली. मात्र यासाठी त्यांनी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह खंडित केले आणि याचा फटका चव्हाण यांच्या शेतीला बसला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तलाव बांधला व तलावाच्या बंधाऱ्यांची उंची वाढवली असल्याने नैसर्गिक पाणी प्रवाह थांबवत निचरा होणारे पाणी अडविल्याने तलावातील पाणी काटोकाट भरल्याने पाणी मागे फिरून समेळ चव्हाण यांच्या अडीच एकर शेतीत तुंबट मारत भरुन रहात असल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने दोन वर्षापासून शेतीचे अतोनात नुकसानीला सामोरे जात असल्याचे समेळ चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले आहे.
अलका चव्हाण समेळ यांनी याबाबत खालापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकरी यांचे नुकसान भरपाई व केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अलका चव्हाण समेळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही प्रशासन ढिम्म असल्याने अलका चव्हाण समेळ व त्यांची ७७ वर्षांची आई सुलोचना चव्हाण व यांनी ७ जून २०२४ रोजी उपोषणाला सुरुवात केली. अखेरीस या उपोषणाची दखल घेऊन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी येऊन तलावाची भिंत तोडण्याचे आदेश दिल्यावर हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली. तसेच प्रशासनासमोर चव्हाण यांच्या शेतीचे माझ्याकडून नुकसान होणार नाही असा शब्द त्यांनी दिला. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांनी तोडलेली भिंत आणखी उंच बांधल्याने हाच प्रकार समोर आला आहे. प्रशासनाचे आदेश याच तलावात बुडवत आहुजा यांनी पुन्हा बांधकाम केल्याने यंदा पुन्हा चव्हाण यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. १२ महिने शेती करणारे आम्ही मराठी शेतकरी यामुळे चिंतीत झालो आहोत. आज शेतीकडे शेतकरी पाठ फिरवत असताना आम्ही आमची शेती जोपासून आहोत ही आमची चूक आहे का ? मराठी शेतकऱ्याने कायम अन्याय सहन करायचा का ? श्रीमंताला माफी आणि मराठी शेतकऱ्याला फाशी हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आहे का? तहसील प्रशासन, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी मराठी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कुणाच्या भीतीपोटी हबकत आहेत? छोटासा स्विमिंग पूल बांधण्यासाठी अनेक अटी शर्ती आहेत तर शेतकऱ्यांच्या लगत शेततलाव बांधण्यासाठी त्याची उंची वाढविण्यासाठी, त्याची खोलीकरण करण्यासाठी, कोणत्याच अटी शर्ती नियम लागू नाही का? पाटबंधारे विभाग व कृषी विभागाचे नक्कीच तालुक्यात कोणते काम आहे? परराज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांनी मराठी शेतकऱ्यांना नाहक त्रास द्यायचा आणि मराठी शेतकऱ्यांनी विदेशात जायचे का ? आहुजा यांनी आपल्या रिसॉर्टमध्ये काय करावे हा त्यांचा प्रश्न असला तरी कायद्यानुसार नैसर्गिक नाल्यांची वाट अडविणे आणि ती बदलणे चुकीचे नाही का ? खालापूर तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाला देखील अहुजा यांनी तिलांजली दिल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला असून आता महसूल प्रशासन अशा मुजोर धनदांडग्याला कायद्याचा झटका देणार का ? की तेरी भी चूप और मेरी भी चूप...मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा, ह्या भूमिकेत बसणार ? असा जळजळीत सवाल अलका समेळ चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.