* कोट्यवधी रुपयांचा ठेका देवूनही शहर अस्वच्छ?
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहर व परिसरातील विविध भागात नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शहरात मच्छर, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घाण, दुर्गंधी, अस्वच्छता जणू खोपोलीच्या पाचवीला पुजली आहे काय? असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करीत आहेत. डास आणि अस्वच्छतेने खोपोलीकर त्रस्त झाले आहेत.
जनता विद्यालय शाळा, कब्रस्तान समोर तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी दररोज भरमसाठ कचरा टाकला जातो. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जंगली जनावरे, भटके कुत्रे, मोकाट जनावरे तोंड मारताना दिसून येत आहेत. शाळेसमोर घाण टाकत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र हे घाणीचे ढिग पाहिल्यावर दिसून येत आहेत. या घाणीवर तोंड मारणारी जनावरे रस्त्यावर धावून वाहनांमध्ये येत असल्याने अनेक अपघात होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
खोपोली शहर स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेने कोट्यवधी रुपयांची ठेकेदारी दिली आहे. दररोज नगर परिषदेच्या घंटा गाड्या संपूर्ण शहरातील कचरा उचलण्यासाठी फिरत असतात तसेच मुकादमाच्या देखरेखीखाली व आदेशानुसार सकाळी पहाटेपासून कर्मचारी जागोजागी स्वच्छता करत असतात तरी शहरात घाणीचे ढिगारे कसे दिसून येतात ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सायंकाळी घरामध्ये थांबणे शक्य होत नाही. गार्डन, मैदानांमध्ये थांबता येत नाही. डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढत आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या समस्येमुळे खोपोली शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औषध फवारणीचे प्रमाण वाढविले पाहिजे, सायंकाळी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वर्षभरापासून डास व अळीनाशक औषध फवारणी केली जात नाही. गटारीमध्ये धुरळणी व औषध फवारणी केली जात नाही. वारंवार तक्रारी करून प्रशासन व ठेकेदार त्याकडे लक्ष देत नाहीत. अनेक भागात गटारी व कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे आहेत. शहरातील प्रत्येक भागात हिच परिस्थिती आहे. नगर परिषदेचे लोकसेवक दररोज दुपारी कार्यालयातून जेवण करण्यासाठी घरी जात असतांना यांना हे ढिगारे दिसत नाही का? मुख्याधिकारी साहेब महिन्यातून किमान पाच दिवस तरी शहरात सुरु असलेल्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी का जात नाहीत? नागरिकांना सुविधांचा लाभ मिळतो की नाही यासाठी नागरिकांशी संवाद का साधत नाहीत? या लोकसेवकांना फक्त श्रीमंताची कामे करण्यासाठी नोकरी देण्यात आली आहे का ? आधीच्या मुख्याधिकारींनी खोपोली शहराचा खेळखंडोबा केला तर आताचे मुख्याधिकारी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकून चालणार का? स्वच्छ खोपोली सुंदर खोपोली आता स्वप्नातच राहणार का? असा संतप्त सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे.