* प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून पाणी जात असताना एसटी नेली पुढे
* भेरव अंबा नदी पुलावरील घटना
* चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
रायगड / प्रतिनिधी :- पाली बस स्थानकावरून बुधवारी (ता. 24) सकाळी पावणे अकरा वाजता सुटणारी घोडगाव मार्गे पेणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली. मुसळधार पाऊस सुरु होता. अंबा नदीने रुद्ररूप धारण केले होते. भेरव गावाजवळील अंबा नदीपुलावरून पाणी जात होते. अशा धोकादायक परिस्थितीत मागचा पुढचा विचार न करता चालकाने स्वतःचा व प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली. यासंदर्भात संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली असून पाली बस स्थानकात असे निवेदन देखील देण्यात आले आहे.
पुलावरून जाणाऱ्या एसटी बसचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहणारे तसेच यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. चालक व वाहक यांच्या बेदरकार वर्तनाबाबत कारवाई करण्यात यावी असे देखील बोलले जात आहे.
पुलावरून पाणी जात असताना देखील धोकादायकरित्या येथून बस नेतांना मी स्वतः व पुलाच्या दोन्ही बाजूला उपस्थित नागरिकांनी पाहिले आहे. अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे खूप निंदनीय आहे. त्यामुळे संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांचे निलंबन न केल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल.
- अमित गायकवाड (युवक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, रायगड).
सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन अशा निष्काळजी वाहकावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी वाहतूक नियंत्रण डेपो गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क साधला आहे व त्यांच्याकडून अशा वाहकावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे त्यांनी त्यांचे मत व्यक्त केला.
- निवास सोनावळे (व्हॉईस ऑफ मीडिया, सुधागड तालुका अध्यक्ष)