* खालापूर नगर पंचायतीच्या भोंगळ कारभाराने नागरिकांना त्रस्त
खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर नगर पंचायतीचा भोंगळ कारभार सध्या चव्हाट्यावर आला आहे. सफाई कर्मचारी यांचे पगार वेळेत होत नसल्याने कामगार कामावर येत नाहीत, त्यामुळे सध्या घरोघरी कचरा साचला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून खालापूर शहरात घंटागाडी न आल्यामुळे ओला व सुखा कचरा नागरिकांच्या घरी अथवा सार्वजनिक ठिकाणी साचला आहे. कचरा उचलला जात नसल्याने सर्वत्र कचरा पसरत असून मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली आहे. पाऊस खूप पडत असल्याने नागरिकांना कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न पडला आहे. कचरा घरी जमा करून ठेवायचा तर तो किती दिवस ठेवायचा हा ही प्रश्नच निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सफाई कर्मचारी यांचे पगार वेळेत होत नसल्याने कामगार कामावर येत नाहीत. नगर पंचायतीचे अधिकारी यांना याबाबत कुठल्याही प्रकारची आस्था राहिली नसून त्यांचा याबाबत बेजबाबदारपणा दिसून येत आहे. खालापूर शहरातील नागरी समस्यांवर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर अधिकारी यांच्या विरोधात या सर्व विषयावर भारतीय जनता पार्टी खालापूर शहराच्या वतीने मोठे आंदोलन उभारणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.