वसई विरार महानगरपालिका ठेका कर्मचारी यांचा संप तूर्तास मागे

* महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून दैनंदिन काम करणार

वसई / नरेंद्र एच. पाटील :- वसई-विरार शहर महानगर पालिकेत कार्यरत ठेका कर्मचारी यांना महानगर पालिका आस्थापनेवर कायम करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, यासाठी गतवर्षी म्हणजे दि. ३ जुलै २०२३ रोजी आमदार हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर तथा कामगार नेते राजीव पाटील व युवा आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार संघटना व वसई विरार महानगर पालिकेतील कार्यरत सर्व ठेका कर्मचारी यांनी महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चास सर्व राजकीय पक्षाने पाठिंबा दिलेला होता. त्यावेळेस पालिका प्रशासनाने ठेका कर्मचारी यांचा विषय मार्गी लावू व त्यांना महानगर पालिकेच्या आस्थापनेवर ठोक वेतनावर घेण्याचे तोंडी आश्वासन दिले होते.

परंतु वारंवार विनंती करूनही, महानगर पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांचा समस्यांचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरल्याने ठेका कर्मचाऱ्यांकडे संपावर जाण्याशिवाय पर्याय नाही. याकरीता वसई-विरार शहर महानगर पालिका ठेका कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी दि. ३ जुलै २०२४ रोजीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलेला होता. तथापि सद्यस्थितीत अधिवेशन कालावधीत ठेका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासनाची व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सदर ठेका कर्मचारी हे संपावर न जाता दि. ३ जुलै 2024  पासून काळ्या फिती लावून  महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करून आपले दैनंदिन कामकाज  करणार आहेत.

याबाबत महानगरपालिका प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन ठेका कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत विचार करून  ठोस पाऊले उचलली पाहिजेत. अन्यथा ठेका कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post