वसई / नरेंद्र एच. पाटील :- पावसाळी अधिवेशनात बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून न्याय देण्याची मागणी लावून धरली. आदिवासी विकास विभागातील आकृतीबंधानुसार भरती होत नसणे, आकृतीबंधाची पूर्णपणे अंमलबजावणी आदिवासी विकास विभागाकडून न होणे, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने न बघणे, परिणामी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने लक्ष घालून विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी जी.एन.एम. पद सर्वप्रथम भरण्याची आवश्यकता असल्याचे आ. राजेश पाटील यांनी सांगितले.
तसेच सहाय्यक अधिक्षक या पदासाठी २०१ विद्यार्थ्यांची ठेवलेली अट रद्द करुन १ ते १०० विद्यार्थ्यामागे १ सहाय्यक अधिक्षक या प्रमाणे सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आकृतीबंधाची पुनर्रचना करुन ५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक करणेबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना करणे संदर्भात महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये आदिवासी विकास मंत्री महोदयांचे आमदार राजेश पाटील यांनी लक्ष वेधले.
