* मागण्या पूर्ण न झाल्यास तर १ ऑगस्टपासून साखळी उपोषण आणि १५ ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन - ॲड. कैलास मोरे
कर्जत / पंकेश जाधव :- कर्जत तालुक्यात सगळीकडे सुरू असलेल्या विजेच्या समस्येबाबत नागरिक हैराण झाले आहेत. एक तर महावितरण सेवा बरोबर देत नाही. आणि बिल भरमसाठ येते. वेळोवेळी तक्रार करून महावितरणचे कर्मचारी व अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे आज कर्जत तालुक्यातील शेकडों नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चा वेळी कर्जतमधील सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटना, व्यापारी, पत्रकार तसेच राजकीय पद बाजूला ठेऊन सामान्य नागरिक म्हणून सामील झालेले राजकीय नेते यांनी सहभाग घेतला. कर्जत शहरातील भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मुक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडों नागरिक तसेच महिलाही सहभागी होत्या. सकाळपासूनच मुसळधार पाऊस असूनही या मोर्चामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
महिलांच्या शिष्टमंडळाने पुढे महावितरण कार्यालयात जावून निवेदन दिले. लवकरच कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीसोबत चर्चा करून निवेदनातील मुद्यांवर चर्चा करुन यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे महावितरणच्या वतीने अधिकारी आर. बी. माने आणि उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी सांगितले. त्यानंतर वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने ॲंड. कैलास मोरे आणि प्रवीण गांगल यांनी उपस्थितांचे आभार मानत मोर्चाचा समारोप करीत महावितरणला 31 जुलैपर्यंत वेळ देत आहोत. मात्र सुधारणा झाली नाही तर 1 ऑगस्टपासून साखळी उपोषण करू त्यानंतर पण सुधारणा नसेल तर 15 ऑगस्ट रोजी यापेक्षा मोठे आंदोलन उभारु असे सांगितले. आता महावितरण कर्जत किती सुधारणा करतो हे पाहणे गरजेचे ठरेल. आजच्या मोर्चाला मोठ्या प्रमाणत जनसमुदाय लाभला. यावेळी अनेक संघटनांनी या मोर्चाला पाठींबा दर्शविला होता. हे आंदोलन सर्वसामान्य लोकांचे होते ते त्यांनी यशस्वी करून दाखविले.