कर्जतमध्ये शिवसंपर्क अभियान अंतर्गत संवाद दौरा

 


* डॉं. बाबासाहेब यांना मानणारे आपण आहोत म्हणूनच हा विजय देशाचा आहे. भाजपला आपण संविधान बदलण्यापासून रोखले - आदित्य ठाकरे

कर्जत / नरेश जाधव :- लोकसभा निवडणुकीत गद्दारांना आपण धडा शिकवला आहे आणि आता विधानसभेत पण शिकवायचा आहे. ४०० पारची हवा उठविणारी भाजप सुरुवातीला स्वतःच नाव घेत होती ते आता एनडीए बोलत आहेत. संविधान बदलायला निघालेले त्यांना देशातील नागरिकांनी धडा दिला आहे. डॉं. बाबासाहेब यांना मानणारे आपण आहोत म्हणूनच हा विजय देशाचा आहे. भाजपला आपण संविधान बदलण्यापासून रोखले आहे. केंद्रात त्यांचे सरकार असले तरी ते मित्रपक्षांवर आहे. तेव्हा खेळ कधीही बदलू शकतो, देशात इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते, असे सूतोवाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी कर्जत येथे केले  आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या संवाद दौऱ्याची कर्जतमधून सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना आदित्य ठाकरे हे संबोधित करीत होते. 

कर्जत तालुक्यात आज दि. १६ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहराजवळील किरवली येथील साईकृपा शेळके मंगल कार्यालय येथे ही बैठक पार पडली. यावेळी मंचावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते सचिन आहिर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर तथा महिला संपर्क प्रमुख किशोरी पेडणेकर, जिल्हा सल्लागार बबन पाटील, सुनील पाटील, उपजिल्हा प्रमुख नितिन सावंत, माजी पक्ष प्रतोद भाई शिंदे, जेष्ठ नेते रियाज बूबेरे, उपतालुका प्रमुख दशरथ भगत, तालुका संघटक बाबू घारे, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी, रेखा ठाकरे, अनिता पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कठीण परिस्थितीत आपण लढलात आणि जिंकलात त्याचे आभार मानायला मी येथे आलो आहे. घरी शंकराचार्य हे भेटीसाठी घरी आले होते. त्यावेळी ते म्हणाले धर्मात सगळ्यात मोठं पाप हे विश्वासघात आहे. लोकसभेत त्या गद्दारांना आपण धडा शिकवला आहे आणि आता विधानसभेत पण शिकवायचा आहे. त्या गद्दाराना आता गाडायाचं आहे. इतक्या दिवसांत महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिम्मत झाली नाही. त्यांना माहीत आहे आपल्याला जनमत मिळणार नाही कारण लोकांच्या मनात आता महाविकास आघाडी आहे. तर उध्दव ठाकरे वर्षा बंगला सोडत असताना येथील शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होते. आम्ही तयार आहोत या मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवू. येथे अद्यावत कुठलीही आरोग्य सुविधा उपलब्ध नाही, येथे ३ महिने आपण टँकरने पाणी पुरवलं, पाणी टंचाईची मोठी समस्या आहे, येथे रस्ते आणि लाईटच्या त्याच गोष्टी सांगून निवडणूक लढवली जाते. लोकसभेच्या निवडणुकीच्या समोर मोठी धनशक्ती होती. मात्र आपल्याकडे होता तो प्रामाणिक शिवसैनिक त्यावरच या मतदारसंघात आपण १८ हजारांचे मताधिक्य घेतलं, असे भावनिक विधान उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासैनिक आदी उपस्थित होते. 

लोकसभेच्या निवडणुकीत येथे चीड होती ती दिसून आली. मात्र, यंत्रणा यांनी आपल्या मदत केली नाही. तेव्हा आता आगामी निवडणुकीत मतदार यांची नावं नोंदवून घ्या. टेबलावर नाचणाऱ्यांना खाली उतरवत नाही तो शांत बसणार नाही. असे म्हणत शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर यांनी स्थानिक शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधला. 

आता हवेत राहू नका आता, जोमाने कामाला लागा. लोकसभेत आपल्याला या मतदारसंघात यश मिळालं नसेल तरी आता त्याचा वचपा काढायचा आहे. ज्यांना लहानाचे मोठे केले त्यांनीच त्रास दिला. आज जे आमदार आहेत त्यांची कुवत होती का आमदार होण्याची ते केवळ पक्षांमुळे आमदार झाले मात्र तेच पक्षाला सोडून गेले. फोकस्कोन सारखा प्रकल्प येथून जाताना येथील खासदार हे तोंडात बोटे घालून बसले होते. कर्जतमधून या संवाद दौऱ्याची सुरुवात झाली आहे. निष्ठावान शिवसैनिकांसोबत आपला पक्ष असेल असे प्रतिपादन शिवसेना उपनेते सचिन आहिर यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post