* आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण
कर्जत / नरेश जाधव :- आज दि. 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदार संघात आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या प्रति पंढरपूर आळंदी भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. सकाळीच विठ्ठल मूर्ती व परिसर सुशोभिकरण करण्यात आले व पहाटेपासूनच भाविकांनी आपल्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
याप्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी भव्य विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण केले व कर्जत खालापूर मतदार संघातील तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना थोरवे म्हणाले की, उल्हास नदीकाठी उभारण्यात आलेल्या या भव्य विठ्ठल मूर्तीचा दर्शनाचा माझ्या तालुक्यातील तमाम जनतेने तसेच ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही अशा व्यक्तींना याच ठिकाणी पंढरपूर निर्माण केल्याची भावना व्यक्त केली. तसेच तालुक्यातील तमाम नागरिकांना सुख-समृद्धी देण्यासाठी आमदारांनी विठ्ठलाला साकडे घातले त्यानंतर फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेले फराळ वाटपाची सुरुवात आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते करण्यात आली.
त्यानंतर सकाळी दहा वाजता कर्जत शिक्षण प्रसारक महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन संपन्न झाले. दरम्यान, कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत म्हणजेच दिंडी वेशभूषेमध्ये विठ्ठल मूर्तीला दिंडी प्रदक्षिणा पूर्ण केली व नंतर विठ्ठल भक्तीत लीन होणाऱ्या गीतांवर विविध प्रकारचे सादरीकरण केले. नंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत भजन भूषण कैलासवासी गजानन बुवा पाटील यांचे पट्ट शिष्य दीपक बुवा कोरडे यांचे सुश्राव्य भजन सादर झाले. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गायिका निकिता ठोंबरे यांनी विठ्ठल भक्ती गीते सादर केली. दरम्यान, तालुक्यातून व तालुक्यात बाहेरून आलेल्या विठ्ठल भक्तांसाठी दिवसभर फराळ वाटप सुरू होते. या विठ्ठल मूर्ती दर्शनाचा असंख्य भक्तांनी आनंद घेतला व त्यांच्या चेहऱ्यावर साक्षात पंढरपूर या ठिकाणी आम्ही विठ्ठलाचे दर्शन करून आलो की काय अशा प्रकारचा भाव स्पष्ट दिसत होता.

