पंढरपूरला जाणाऱ्या पाच भाविकांचा मृत्यू

* मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भाविकांची बस दरीत कोसळली

खोपोली / प्रतिनिधी :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बसने मागून ट्रॅक्टरला धडक देऊन बस 20 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये अंदाजे 54 प्रवासी होते मात्र पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला ही खाजगी ट्रॅव्हल बस यात्रेसाठी जात होती. 


मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवकर गावाजवळ आली असता अंधारात पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला बसची जोरदार धडक बसली. बस आणि ट्रॅक्टर दोन्ही वाहने 20 ते 25 फूट रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील तीन प्रवाशी तर ट्रॅक्टरमधील दोन अशा एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर असून 42 भाविक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना तात्काळ एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, महामार्ग पोलिस, पनवेल पोलिस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, फायर बिग्रेड, सर्व यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post