खोपोलीत उभी राहतेय कचरा निवारण चळवळ

 

* खोपोली खालापुर संघर्ष समिती ठरत आहे शहराला वरदान

* डॉं. शेखर जांभळे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या जन चळवळीला जोरदार प्रतिसाद

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचरा समस्या ही सर्व ठिकाणी विक्राळरूप धारण करीत आहे. महावितरणच्या समस्येवर शहर व तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीची स्थापना केली. महावितरणचा लपंडाव हा या समितीच्या माध्यमातून आटोक्यात येत आहे. यापूर्वी शहर अंधारात असताना नेमके काय घडते याची कल्पना येत नसल्याने नागरिकांना आता कुठल्या प्रकारची समस्या आहे व कधीपर्यंत विद्युत प्रवाह सुरळीत होईल याची माहिती मिळत नव्हती तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेने नागरिक त्रस्त झाले होते. संघर्ष समितीने उठाव केल्यावर बऱ्याच अंशी सुधारणा होत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर लगेच माहिती मिळते तर कधीपर्यंत पुरवठा सुरू होईल व तांत्रिक कारण काय आहेत याची देखील माहिती उपलब्ध होत आहे.

महावितरणच्या विषयावर काम करताना इतर समस्यांची ही समूहावर चर्चा होत असताना खोपोलीत असणारा कचरा समस्या ही नागरिकांची डोकेदुखी बनलेली आहे. यासाठी प्रशासनामार्फत चालवली जाणारी घंटागाडी ही वेळेत येत असल्याने व घंटागाडीची अगदी वाईट अवस्था असल्याने शहर बकाल होत चालले आहे. खोपोली भाजी मार्केट परिसरात तर अक्षरशः दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, यावर संघर्ष समितीने नगरपालिकेला पत्राद्वारे विनवणी करून 18 जुलै रोजी संयुक्त चर्चेचे आयोजन केले होते. यामधून अधिकारी वर्ग व कर्मचारी यांची तुटकी संख्या आहे हे लक्षात आल्याने संघर्ष समितीने यावर तोडगा काढण्याचे ठरवले. सोशल मीडिया याचा प्रभावी वापर केला तर काय होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खोपोली खालापूर तालुका संघर्ष समिती. संघर्ष समितीच्या माध्यमातून आता प्रत्येक वार्डात खोपोली नगरपालिकेचे मुकादम, स्वच्छता कर्मचारी घंटागाडी, घंटागाडीचे ड्रायव्हर व जागृत नागरिक यांच्या समूहाच्या माध्यमातून घंटागाडीचा कचरा संकलन करण्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. याचसोबत प्रशासनाने शहरातील कचऱ्यावर योग्य प्रकारे नियोजन केल्यास उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक यांनाही दंड करावा अशी ही मागणी केलेली आहे, आतापर्यंत अनेक समस्यांवर उपाय ठरणार्‍या खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून कचरा क्रांती नक्कीच घडेल असा वाद खोपोलीतील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

शहरासाठी मनापासून काम करण्यास एकत्र आलेल्या विविध पक्ष, संघटना, व्यापारी, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, शिक्षक, वकील, पत्रकार, अध्यात्मिक संघटना, ज्येष्ठ नागरिक, जागृत नागरिक या सर्वांनी सोशल मीडियावर एकत्र येत शहरातील समस्यांवर आवाज उठविला आहे. ज्येष्ठ वकील मीना बाम, शिक्षणतज्ज्ञ उल्हास देशमुख, डॉं. शेखर जांभळे, आशपाक लोगडे, मोहन केदार, उबेद पटेल, नरेंद्र हर्डीकर, संतोष गायकर, सुरेखा खेडकर, कांतीलाल पोरवाल, सुभाष पोरवाल, अजित ओसवाल, समीर साठे, नितेश कसबे, इशिका शेलार,राजाबापु सगळगिळे, बाबूभाई ओसवाल, राजेंद्र फक्के, किशोर साळुंखे, राकेश ओसवाल, निखिल पोळ, किरण हडप, समिर देवकर यासारखी मंडळी एकत्र येवून शहरासाठी अहोरात्र झटत असल्याने नागरिकांना हक्काचे व्यासपीठ यामुळे उपलब्ध झालेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post